मलकापूर/ प्रतिनिधी
बोदवड रस्त्यावरील एका शेतातील विहिरीत बुडून ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास मलकापूर-बोदवड रस्त्यावरील सामाजिक वनीकरण विभागाला लागून असलेल्या वानखेडे यांच्या शेतातील विहिरीत एक तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीबाहेर काढला. तपासादरम्यान मृतक तरुणाची ओळख श्रीकृष्ण वासुदेव दाणे (वय ३६) रा.माता महाकाली नगर, मलकापूर अशी पटली. या घटनेबाबत मृतकाचा लहान भाऊ गोविंदा वासुदेव दाणे रा. माता महाकाली नगर, मलकापूर याने मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीवरून कलम १९४ भानासुसं नुसार मर्ग दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे करत आहेत.
