रायपूर, दि. ५ सप्टेंबर : प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूर अंतर्गत येणाऱ्या मातला व उंबरखेड गावांमध्ये साथरोग प्रतिबंधक तसेच जलद हिवताप कंटेनर सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. डेंग्यू, मलेरिया व हिवतापासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकांनी घरोघरी जाऊन पाहणी केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले, जिल्हा हिवताप अधिकारी एस. बी. चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. डी. सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय जाधव व डॉ. शिल्पा सरपाते तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व आरोग्य सहाय्यक राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
मोहीमेदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या घरांना भेटी देत पाणी साठवून ठेवलेल्या विविध कंटेनरची तपासणी केली. ज्या ठिकाणी पाण्यात डासांच्या अळ्या आढळून आल्या, ते कंटेनर रिकामे करून स्वच्छ करण्यात आले. तसेच हलविता न येणाऱ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या व हौदांमध्ये डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी टेमिफॉसचा वापर करण्यात आला.
यावेळी नागरिकांना ‘आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा’ हा संदेश देत घर परिसरात पाणी साचू न देण्याचे आवाहन करण्यात आले. डेंग्यू, मलेरिया व हिवताप या आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूर अंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. घराघरांत तपासणी आणि जनजागृतीमुळे परिसरात साथरोग प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या.
पावसाने दडी मारल्याने पिके सुकली; प्रतापराव जाधवांनी बांधावर जाऊन केली पाहणी
बुलडाणा अर्बनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘व्हायरल मिमिक्री रील स्पर्धा’
