दुबई : महिला आशिया कप २०२६ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा तब्बल ७ गडी राखून धुव्वा उडवत स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदवला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचे ५६ धावांचे माफक लक्ष्य अवघ्या ८.४ षटकांत तीन गडी गमावून सहज पार केले. भारताकडे तब्बल ६८ चेंडू शिल्लक होते. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचा डाव पूर्णपणे कोलमडला. पाकिस्तानी संघ अवघ्या १८.१ षटकांत ५५ धावांवर सर्वबाद झाला. ही पाकिस्तानची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या ठरली.

पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली
पाकिस्तानच्या डावाची सुरुवात मुनीबा अली आणि शवाल झुल्फिकार यांनी केली. दोघींनी ४.३ षटकांत २७ धावांची भागीदारी केली. मात्र, मुनीबा १३ धावांवर बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या डावाला लागलेली गळती थांबली नाही.
श्री चरणीने गुल फिरोजा आणि शवाल झुल्फिकार यांना बाद करत पाकिस्तानला मोठा धक्का दिला. अवघ्या २९ धावांत पाकिस्तानने तीन विकेट गमावल्या. त्यानंतर ठरावीक अंतराने विकेट पडत गेल्या आणि ३५ धावांपर्यंत पाकिस्तानच्या सहा फलंदाज तंबूत परतल्या होत्या.
उम्म-ए-हानी आणि इमान फातिमा यांनी सातव्या विकेटसाठी २४ चेंडूंत १० धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर पाकिस्तानचा उर्वरित डाव झटपट संपला आणि संपूर्ण संघ ५५ धावांत गारद झाला.
भारताकडून श्री चरणीने ४ षटकांत ७ धावा देत ३ विकेट, तर प्रेमा रावतने ४ षटकांत ९ धावा देत ३ विकेट घेतल्या. दीप्ती शर्माने ३.१ षटकांत केवळ ५ धावा देत २ फलंदाजांना बाद केले.
फातिमा सनाने भारताला दिला धक्का
५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. शेफाली वर्माने डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. मात्र, पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने दुसऱ्याच षटकात भारताला दोन धक्के दिले. तिने प्रथम शेफाली वर्माला, त्यानंतर प्रतिका रावलला बाद केले.
शेफालीने ६ चेंडूंत १२ धावा केल्या, तर प्रतिकाला ४ धावांवर माघारी जावे लागले. त्यानंतर स्मृती मंधानाही ११ चेंडूंत ९ धावा करून फातिमा सनाच्या गोलंदाजीवर बाद झाली.
भारताची धावसंख्या तीन विकेटवर ३४ धावा असताना दीप्ती शर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी डाव सावरला. दोघींनी संयमी फलंदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. अखेर हरमनप्रीत कौरने षटकार ठोकत भारताचा विजय निश्चित केला.हरमनप्रीतने १८ चेंडूंत नाबाद १८ धावा केल्या, तर दीप्ती शर्माने १२ धावांचे योगदान दिले.
या विजयासह भारतीय महिला संघाने महिला आशिया कप २०२६ मध्ये सलग तिसरा विजय मिळवत विजयी हॅटट्रिक साधली. पाकिस्तानचा हा स्पर्धेतील दुसरा सामना असून त्यांना पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.
बुलडाणा जिल्ह्यातील ४९ रुग्णांना पीएम रिलीफ फंडातून १ कोटी २० लाखांची मदत
