बुलडाणा (प्रतिनिधी) : गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील अनेक भागांत पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शनिवारी खामगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. “पाऊस न पडणे ही निसर्गाची अकृपा आहे. त्यामुळे खचून जाऊ नका; सरकार तुमच्या पाठीशी आहे,” असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि सुरुवातीला पिकांची वाढही चांगली झाली. मात्र, मागील दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.
बुलडाणा जिल्ह्यात यंदा सुमारे ३ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सोयाबीनचे पीक फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी सुमारे ४० टक्के सोयाबीन पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून उत्पादनात सुमारे ५० टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना परिस्थितीचा सामना करण्यासाठी धीर देण्याच्या उद्देशाने प्रतापराव जाधव यांनी खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा, अटाळी, शहापूर, आडगाव, बोरी, शिर्ला आणि नेमाने येथील शेतांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी केली. पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकांची स्थिती त्यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतली.
“निसर्गाच्या लहरीपणावर आपले नियंत्रण नाही; मात्र अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” अशी ग्वाही जाधव यांनी यावेळी दिली. तसेच पाण्याअभावी पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहून त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष डिवरे, अमोल अंधारे, तालुकाप्रमुख राजू बघे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
बुलडाणा जिल्ह्यातील ४९ रुग्णांना पीएम रिलीफ फंडातून १ कोटी २० लाखांची मदत
