चौथ्यांदा भेट नाकारल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप; ‘आयुक्तांनी प्रकाश आंबेडकरांची माफी मागावी’ अशी मागणी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट नाकारल्याचा दावा वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकारानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, आयुक्तांनी प्रकाश आंबेडकरांची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध निर्णयांवर गेल्या काही दिवसांत टीका होत असतानाच आता आयुक्त अश्विनी भिडे यांच्या कथित भेट नाकारण्याच्या प्रकारामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रकाश आंबेडकर हे मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, आयुक्तांनी भेट नाकारल्याचा आरोप वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ‘प्रकाश आंबेडकर हे आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पालिका आयुक्त बैठक नाकारत आहेत. बाळासाहेबांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्या सक्षम नाहीत का? की कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्यामुळे बैठक नाकारली जात आहे?’ असा सवाल वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, कामगारांचा रोष वाढल्यानंतर आयुक्तांच्या पीएकडून फोन आल्याचा दावाही करण्यात आला. ‘मॅडम तुमच्यासाठी थांबल्या आहेत,’ असे सांगण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले. डीसीपीच्या मागणीनंतर आम्ही भेटीसाठी आलो. मात्र, महापालिका कार्यालयात आल्यानंतर आयुक्त उपस्थित नसल्याचे समजले, असा आरोपही त्यांनी केला.
‘आयुक्त उपस्थित नसतील तर वेळ कशासाठी?’
आयुक्त भेटीसाठी उपस्थित राहणार नसतील तर आम्हाला वेळ कशासाठी देण्यात आला, असा संतप्त सवाल वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला. महापालिकेतील कामगारांच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. मुंबई महापालिकेचा कामगार काम करतो म्हणून आयुक्तांच्या खुर्चीला शोभा येते; अन्यथा त्या खुर्चीला किंमत नाही, अशी टीका त्यांनी केली.
वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, प्रकाश आंबेडकर यांना भेट नाकारण्याचा हा प्रकार चौथ्यांदा घडला आहे. सोमवारच्या दिवशी दुपारी ३ ते ५ हा आयुक्तांच्या भेटीचा कालावधी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही भेट झाली नसल्याचा आरोप करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची माफी मागावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, भेट नाकारल्याच्या आरोपावर आयुक्त कार्यालयाकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नसल्याने या प्रकरणातील पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
बुलढाणा येथील नवजात शिशु कक्षाचा रिअॅलिटी चेक; सुविधांचा दावा अन् प्रत्यक्षात काय?
बुलडाणा अर्बन जळगाव खान्देश शाखेचे स्वमालकीच्या वास्तूत २६ ऑगस्ट रोजी होणार स्थलांतर
