अमृत महोत्सवी सोहळा
सर्जेराव चव्हाण हे आपल्या सगळ्यांसाठी आदर्श – शायर डॉ.गणेश गायकवाड
बुलढाणा/प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व तसेच संवेदनशील कवी सर्जेराव चव्हाण यांनी वयाची ७५ वर्ष १ जुलै २०२६ रोजी पूर्ण केली. यानिमित्ताने त्यांच्या प्रति असलेल्या कृतज्ञतेतून अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अमृत महोत्सवी सोहळ्यात सुप्रसिद्ध सर्जन तथा शायर डॉ. गणेश गायकवाड यांनी आपल्या गझल व कवितेमधून ज्येष्ठांची या वयातील काळजी आणि कुटुंबीयांची भावना व्यक्त केली. वयाच्या ७५ वर्षे देखील निरोगी असलेले सर्जेराव चव्हाण हे आपल्या सगळ्यांसाठी आदर्श असल्याचे देखील ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका शाहीणाताई पठाण या होत्या. नवोदित लेखकांना जेष्ठ साहित्यिक सर्जेराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अनेक गोष्टी शिकता येतील. असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच कानडजे म्हणाले की, आपले शरीर आणि आपले आरोग्य हे आपले जवळचे मित्र असून या वयात आपण त्याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी असे आपल्या मनोगतामधून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एम. कानडजे यांनी व्यक्त केले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीने सर्जेराव चव्हाण हे बुलढाण्याच्या साहित्य क्षेत्रात ओळखले जातात. सत्काराला उत्तर देतांना ते म्हणाले की साहित्याने मला जीवन जगण्याची कला शिकवली. जात धर्म पंथ यापलीकडे जाऊन जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन साहित्यातूनच मला मिळाला. मी सातत्याने पायी फिरत असतो आणि फिरतांनाच मला कवितेचे अनेक विषय सुचतात.ते मी माझ्या कवितेच्या माध्यमातुन मांडतो. माझ्या जीवाभावाच्या माणसांनी माझा केलेला हा सत्कार इतर कुठल्याही पुरस्कारापेक्षा मला खूप मोठा वाटतो.
सन्मानपत्र व शाल देऊन सर्जेराव चव्हाण यांचा अमॄत महोत्सवी सन्मान मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. सन्मान पत्राचे वाचन संदीप राऊत यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली तायडे यांनी केले. या प्रसंगी साहित्यिक अमरचंद कोठारी, शाहीर डी .आर. इंगळे,रवींद्र साळवे, प्रा. सिद्धार्थ काळे यांनी आपल्या मनोगतातून सर्जेराव चव्हाण यांचे कार्य आणि त्यांच्या जात धर्मा पलीकडील माणुसकीच्या स्वभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व साहित्यिक यावेळी उपस्थित होते. संतोष आंबेकर, मधुकर पाटील प्रेषित सिद्धभट्टी, डॉ. गजेंद्र निकम, वैशाली निकम, युवराज कापरे, अनिता कापरे, पंजाबराव गायकवाड यांचेसह चव्हाण कुटुंबीयांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी डॉ विजया काकडे, प्रतिभा गायकवाड, प्रज्ञा लांजेवार, प्रा. विनोद देशमुख, , संदीप राऊत, वैशाली तायडे या सर्वांनी सहकार्य केले.
आठ शिक्षकांची पदे मंजूर; प्रत्यक्षात केवळ सहा शिक्षक कार्यरत
