मोताळा/ प्रतिनिधी
मोताळा तालुक्यातील तळणी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व भातृमंडळ परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे . त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जपत संजय तुकाराम नाफडे यांनी स्वखर्चातून संपूर्ण परिसरात तणनाशक औषधांची फवारणी केली.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि भातृमंडळ परिसरात वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विवाह सोहळे मोठ्या उत्साहात संपन्न होत असतात. त्यामुळे या परिसरात नागरिकांची आणि भाविकांची नेहमीच वर्दळ असते. सध्या पावसाळ्या मुळे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व भातृमंडळाच्या आवारातील मैदानातही मोठ्या प्रमाणावर गवत उगवले आहे. हे गवत अधिक मोठे झाल्यास येथील सपाटीकरण केलेले मैदान विद्रुप होण्याची दाट शक्यता होती. तसेच, वाढलेल्या गवतामुळे परिसरात साप व इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढून येथे भाविकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन संजय नाफडे यांनी स्वखर्चातून संपूर्ण परिसरात तणनाशक औषधांची फवारणी केली. संजय नाफडे यांनी स्वतःच्या खर्चातून तणनाशक औषधे खरेदी करून स्वतःच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व भातृमंडळाच्या संपूर्ण आवारात तसेच परिसरालगतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या गवतावर तणनाशक फवारणी केली.
यामुळे गवत लहान अवस्थेतच नष्ट होण्यास मदत होणार असून परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक राहण्यास हातभार लागणार आहे. या कार्यात संजय नाफडे यांच्या पत्नी रेणुका नाफडे यांनीही सहकार्य केले. यावेळी प्रविण चोपडे, बारसु नाफडे, कल्पेश नाफडे आणि सार्थक नाफडे यांनीही सहकार्य केले. सामूहिक सहभागामुळे संपूर्ण परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने तणनाशक फवारणीचे काम पूर्ण करण्यात आले.
Breaking News पाडळी गावात बिबट्याचा धुमाकूळ; पाच बकऱ्यांचा बळी
