ब्राह्मण वेटाळ परिसरातील घटना; बंद घराचे कुलूप तोडून सोने, चांदी व नगदीवर चोरट्यांचा डल्ला
लोणार, दि. 31 जुलै : लोणार शहरातील ब्राह्मण वेटाळ परिसरात मुसळधार पावसामुळे झाड कोसळण्याच्या भीतीने कुटुंबाने समोरील घरात मुक्काम हलविल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून लाखो रुपयांचे सोने, चांदी व नगदी लंपास केल्याची धक्कादायक घटना ३१ जुलैच्या मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मण वेटाळ परिसरातील रहिवासी सुनील नवरतमल रामावत यांचे जुने व नवीन असे दोन घरे समोरासमोर आहेत. शुक्रवारी दिवसभर शहरात मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे त्यांच्या जुन्या घराजवळील मोठे लिंबाचे झाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून रामावत कुटुंबाने रात्री जुन्या घराला कुलूप लावून समोरील नवीन घरात झोपण्याचा निर्णय घेतला.
नेमकी हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री अंदाजे १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान जुन्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट, लोखंडी आलमारी, धान्याच्या कोठ्या, सोफे तसेच विविध डबे फोडून संपूर्ण घराची उलथापालथ करण्यात आली. चोरट्यांनी कपाटात आणि इतर ठिकाणी लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, नगदी रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. प्राथमिक अंदाजानुसार चोरीचा मुद्देमाल लाखो रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे. चोरी करून चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. शनिवारी सकाळी रामावत कुटुंब जुन्या घरात आले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटे उघडी, आलमारी फोडलेली आणि घरातील वस्तू विखुरलेल्या अवस्थेत पाहून त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने लोणार पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.
या धाडसी घरफोडीमुळे लोणार शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
समृद्धी महामार्गावरील थरारक दरोड्याचा उलगडा; बुलढाण्यातील पाच आरोपी जेरबंद
बुलडाणा अर्बनच्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा; सभासदाचे अतिरिक्त १० हजार रुपये केले परत
लोणारात ठाकरे गटाला मोठे खिंडार?; युवासेनेतील सामूहिक राजीनाम्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
