सीबीआय विभागाचा अधिकारी असल्याची बतावणी करून शहरातील एका ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बाळापूर बसस्थानकावर लुटणार्या समाजातीलच खामगावातील दोन अट्टल तरूणांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील फिर्यादीकडून आरोपींनी ९ लाख ५० हजार रुपयांची रोकड व १० हजाराचा मोबाईल जबरीने हिसकावून नेला होता. याप्रकरपोलिसांनी खामगाव येथून दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून फिर्यादीच्या १०० टक्के मुद्देमालासह २७ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
खामगाव- शहरातील दिपक गुरुबाणी यांच्या दिपक जनरल स्टोअर्स येथे मनोहर रेलुन नथ्थाणी (७१, रा. झुलेलाल नगर) हे कामावर आहेत. शुक्रवारी, दि.१९ जून २६ रोजी दुपारी ३.४५ वा. च्या सुमारास दिपक गुरुबाणी यांनी दिलेल्या निर्देशानुसार ९ लाख ५० हजार रूपये घेवुन बसने अकोला येथे जात होते. बस दुपारी ४.१५ वा. च्या सुमारास बाळापूर बसस्थानकावर थांबली होती. यावेळी एका अनोळखी इसमाने सीबीआय अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र मोबाईलमध्ये दाखवून मनोहर नथ्थाणी यांना तुमच्या बॅगेध्ये पैसे असून चौकशी कामी तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये सोबत यावे लागेल, असे सांगितले. यानंतर दोघे बसमधून खाली उतरले होते. दरम्यान अनोळखी इसमाने कॉल करून पोलिसाची गाडी बोलावतो, असे मनोहर नथ्थाणी याला सांगितले. काही वेळेतच तोंडाला रूमाल बांधलेला एक इसम स्कुटरवर आला व मनोहर नथ्थाणीला स्कुटरवर बॅग ठेवण्यास सांगितले व त्याच्या जवळून मोबाईल किंमत १० हजार रुपये घेतला व पोलिस गाडीमध्ये तुम्ही या असे म्हणून दोघेही पसार झाले व बराच वेळ पर्यंत पोलिसाची गाडी आली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे मनोहर नथ्थाणी याच्या लक्षात आले व त्यांनी ही बाब दिपक गुरुबाणी यांना सांगितली असता दिपक गुरुबाणी बाळापूरला पोहोचले होते. व मनोहर नथ्थाणी याला बाळापूर पोस्टेला तक्रार देण्यास सांगितले.
तक्रारीवरून दोन अनोळखी इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहून अकोला पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी स्थागुशाचे पोलिस निरिक्षक नितीन लेव्हरकर यांना तपासाचे आदेश दिले. नितीन लेव्हरकर यांनी तीन पथके तयार केली. तपासादरम्यान सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक बाबी व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी १२ तासात आरोपींचा शोध लावला व संशयीत हार्दिक मनोजकुमार गुरुबाणी (२२, रा. सिंधी कॉलनी खामगाव) व साहील नंदकिशोर नथ्थाणी (२५, रा. तलाव रोड खामगाव) या दोघांना ताब्यात घेवुन पोलिसी हिसका दाखवला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली व त्यांच्या जवळून २५ लाख रूपये रोख, ३ मोबाईल ( किं. ५० हजार रू.) व २ दुचाकी (किं. २ लाख रू.) असा एकूण २७ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हा शाखेने प्रकरणाचा तडकाफडकी तपास लावल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली व २५ हजार रूपयाचे बक्षिस जाहीर केले.
विदर्भातील शिक्षक चळवळीचे नेते..शिक्षण विश्वातील एक दीपस्तंभ प्रा.बी.टी.देशमुख
