बुलढाणा : समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या प्रश्नांची शासकीय यंत्रणेमार्फत सोडवणूक करण्यासाठी तसेच त्यांना सुलभ मार्गदर्शन मिळावे, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात होणार आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी आपल्या तक्रारी किंवा निवेदन उपजिल्हाधिकारी यांना उद्देशून विहित नमुन्यात दोन प्रतींमध्ये सादर करावे, असे प्रशासनाने कळविले आहे.
तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक असून, संबंधित महिलेने स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे. विहित नमुन्यात नसलेले अर्ज, न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक प्रकरणे तसेच वैयक्तिक स्वरूपाचे नसलेले तक्रार किंवा निवेदन स्वीकारले जाणार नाही.
तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर आयोजन
शासनाच्या निर्देशानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर, तर चौथ्या सोमवारी तालुकास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. या माध्यमातून महिलांना त्यांच्या समस्या शासकीय यंत्रणेसमोर मांडण्याची आणि त्यावर योग्य कार्यवाही मिळवून घेण्याची संधी उपलब्ध होते. समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात ३५२ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी अर्ज मागविले
