मुंबई : मराठी काव्यविश्वात संवेदनशील, सुसंस्कृत आणि विचारशील लेखणीने स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ कवी दत्तात्रेय भास्कर (द. भा.) धामणस्कर यांचे आज निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने शब्दांचे मर्म जाणणारा ऋजू, संवेदनशील आणि विचारवंत कवी गमावला आहे. गेल्या अनेक दशकांपासून ते डोंबिवलीत वास्तव्यास होते. द. भा. धामणस्कर यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९३० रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांत एम.ए. पदवी घेतली. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेत त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली. १९८८ मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. सप्टेंबर १९६० पासून ते डोंबिवलीचे रहिवासी होते. डोंबिवलीच्या सांस्कृतिक आणि वाङ्मयीन क्षेत्राशी त्यांचे अतूट नाते होते. येथील ‘काव्यरसिक मंडळा’च्या सुरुवातीपासूनच्या सक्रिय सदस्यांमध्ये त्यांचा समावेश होता.
रंगरेषांतून मानवी वेदनांना मूर्त स्वरूप देणारे श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली
धामणस्कर यांनी वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी पहिली कविता लिहिली. पुढे ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘कविता-रती’, ‘दीपावली’, ‘हंस’ आणि ‘मराठवाडा’ यांसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. ग्रंथालीच्या ‘दशकाची कविता’ या महत्त्वपूर्ण संकलनातील दहा निवडक कवींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. साहित्य अकादमीच्या साठोत्तरी मराठी कवितेच्या संकलनात तसेच ज्ञानपीठाच्या ‘भारतीय कवितायें १९८३’ या ग्रंथात त्यांच्या पाच कवितांचा समावेश झाला.
त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झाले. त्यांच्या कवितांनी प्रगल्भ वाचकांसोबतच विद्यार्थी वर्गावरही प्रभाव टाकला. महाराष्ट्र सरकारच्या इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मानवी मूल्यांची जपणूक करणारी त्यांची ‘वस्तू’ ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच कर्नाटक सरकारच्या मराठी पाठ्यपुस्तकात ‘कंदील विकणारी मुले’ या कवितेचा समावेश करण्यात आला होता.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित कवी म्हणून त्यांनी सहभाग घेतला. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील त्यांचे कवितावाचनही लोकप्रिय झाले. ‘दिवे असावे’, ‘वस्तू’, ‘हस्तांतर’ यांसह त्यांच्या विविध कवितांमधून मानवी नाती, संवेदना, परंपरा, निसर्ग आणि जीवनमूल्यांचे प्रभावी दर्शन घडते.
द. भा. धामणस्कर यांच्या निधनाने मराठी काव्यक्षेत्रातील एक समृद्ध पर्व संपले आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल साहित्यवर्तुळातून शोक व्यक्त होत असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात ३५२ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी अर्ज मागविले
