बुलढाणा : खाटू श्याम सद्भावना सेवा समितीतर्फे दि. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान खाटू श्यामजीच्या पावन भूमीत श्रीमद्भागवत कथा व धार्मिक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत ज्येष्ठ स्त्री-पुरुष भक्तांचा मोठ्या संख्येने समावेश असून, एकट्याने प्रवास करता न येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी समितीने रेल्वे प्रवास, निवास, भोजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांची चोख व्यवस्था केली आहे.
खाटू श्यामजी येथे पाच दिवसांच्या मुक्कामादरम्यान श्रीमद्भागवत कथा आयोजित करण्यात आली असून, कथेचा मंडप खाटू श्यामजीच्या मंदिराच्या धर्तीवर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला आहे. भक्तांनी सद्भावना सेवा समितीवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करताना समितीचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी, प्रत्येक भक्ताला आनंद मिळावा, सकस आहार व उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी समिती प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
दि. ३१ ऑगस्ट रोजी तीज व चतुर्थी असल्याने भागवत कथा मंडपात महिलांकडून तीज पूजन व चतुर्थी पूजन करण्यात येणार आहे. खाटू श्यामजी येथील विशेष पंडितांच्या मार्गदर्शनाखाली या पूजा पार पडतील. यावेळी भाविकांसाठी संपूर्ण फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रायथल येथील प्रसिद्ध गायक व वाद्यवृंदाच्या माध्यमातून सुंदरकांडाचे आयोजन करण्यात आले आहे.दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी बालसंत श्री. दीपशरणजी महाराज यांच्या उपस्थितीत मंगल कलश यात्रा काढण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचे मुख्य यजमान सौ. सरला सुरेशचंद्र गट्टाणी आहेत.
भक्तांची संख्या वाढल्याने मंदिर परिसरातील तीन ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. दि. ४ सप्टेंबर रोजी समितीतर्फे भाविकांना सालासर बालाजीचे दर्शन घडविण्यात येणार असून, यासाठी मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दि. ३० ऑगस्ट रोजीचे भोजन भाविकांनी स्वतःसोबत टिफिनमध्ये आणायचे असून, त्यानंतरची भोजन व्यवस्था समितीतर्फे करण्यात येणार आहे. खाटू श्यामजी रेल्वे यात्रेची मधुर स्मृती राहावी यासाठी समितीतर्फे प्रत्येक भाविकाला अल्पशी भेट देण्यात येणार आहे. सुमारे ३ हजार किलोमीटरची ही रेल्वे यात्रा असून, प्रति किलोमीटर ५ रुपयांपेक्षाही कमी खर्चात ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. भागवत कथेला समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार आहेत. यात्रा व भागवत कथा यशस्वी करण्यासाठी चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, प्रा. प्रकाशचंद्र पाठक, तिलोकचंद चांडक, सुरेशचंद्र गट्टाणी, सिद्धार्थ शर्मा, उमेश मुंदडा, विजय व्यवहारे, सुभाष दर्डा, मधुकर गायकी, पुरणमल शर्मा, बबन परांजपे, लाला माधवाणी, मनमोहन शर्मा, रामनिवास यादव आदी विशेष परिश्रम घेत आहेत.
यात्रेच्या चोख व्यवस्थेवर समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक जातीने लक्ष ठेवून असून, कथा व यात्रा यशस्वी करण्यासाठी ते तन, मन, धनाने प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती सद्भावना सेवा समितीचे सचिव प्रा. प्रकाशचंद्र पाठक यांनी दिली.
‘शांतीत क्रांती’ करणाऱ्या बुधवतांची राजकीय पकड पुन्हा अधोरेखित
