चिखली : शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि नेहमी वर्दळीचा श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था ते बैल जोडी चौक (जुना सिमेंट रोड) या रस्त्याचे रखडलेले काम येत्या ३ ते ४ दिवसांत प्रत्यक्ष सुरू न झाल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन ‘मनसे स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला देण्यात आला आहे. यासंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना रीतसर निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्रीराम नागरी पतसंस्था ते बैल जोडी चौक हा परिसरातील प्रमुख रस्ता असून या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनधारकांची वर्दळ असते. काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. मात्र, भूमिपूजन होऊन अनेक दिवस उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने गंभीर अपघात होऊन जीवितहानी अथवा कायमचे अपंगत्व येण्याची भीती निर्माण झाली आहे. रस्त्यावरील धूळ आणि खड्ड्यांमुळे परिसरातील नागरिक तसेच व्यापाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
भूमिपूजन होऊनही काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, “केवळ दाखवण्यासाठी भूमिपूजन झाले होते की नागरिकांना चांगला रस्ता मिळणार आहे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या संथ कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन येत्या ३ ते ४ दिवसांत रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू करावे. अन्यथा उद्भवणाऱ्या प्रशासकीय तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस नगर परिषद प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा मनसेने दिला आहे. निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही पाठविण्यात आली आहे. यावेळी मनसे चिखली शहराध्यक्ष नारायण बापू देशमुख, शहर सचिव अजय खरपास, विभागप्रमुख बंटी कळमकर आणि तेजराव इंगळे उपस्थित होते.
‘शांतीत क्रांती’ करणाऱ्या बुधवतांची राजकीय पकड पुन्हा अधोरेखित
