अमरावतीतील गावाचा पत्ता दाखवला जायचा वर्धा जिल्ह्यात; विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना होत होता मोठा त्रास
धामणगाव रेल्वे : वर्धा आणि अमरावती हे शेजारी जिल्हे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये वर्षानुवर्षांची सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक जवळीक आहे. मात्र, हीच भौगोलिक आणि प्रशासकीय जवळीक अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील विटाळा गावासाठी पिनकोडच्या बाबतीत अडचणीची ठरत होती. अखेर वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर शरदराव काळे यांनी या प्रश्नात लक्ष घातल्याने ग्रामस्थांची अनेक वर्षांची समस्या दूर झाली आहे.
भारतीय टपाल विभागाने विटाळा गावासाठी ४४४७०९ हा स्वतंत्र पिनकोड मंजूर केला असून, त्याबाबत अधिकृत आदेशही जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता विटाळा गावाला त्याची स्वतंत्र टपाल ओळख मिळणार आहे.
भौगोलिकदृष्ट्या विटाळा हे गाव अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात येते. मात्र, टपाल विभागाच्या जुन्या प्रशासकीय रचनेमुळे गावाला वर्धा जिल्ह्यातील पुलगाव टपाल कार्यालयांतर्गत असलेला ४४२३०२ हा पिनकोड देण्यात आला होता. परिणामी, विविध ऑनलाइन प्रणालींमध्ये विटाळ्याचा पत्ता टाकल्यानंतर तो अनेकदा ‘पुलगाव, जिल्हा वर्धा’ असा दाखवला जात होता.
ऑनलाइन अर्जांपासून पार्सलपर्यंत अडचणी
या तांत्रिक विसंगतीमुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. शासकीय योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करताना, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरताना तसेच विविध ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून वस्तू मागविताना जिल्ह्याची चुकीची नोंद होत होती. त्यामुळे काही अर्ज तांत्रिक कारणांमुळे अडचणीत येत होते, तर पोस्ट व पार्सल चुकीच्या ठिकाणी जाण्याचे प्रकारही घडत होते.
याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना बसत होता. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.
२२ मार्चला खासदारांकडे मांडली समस्या
या पार्श्वभूमीवर विटाळा येथील ग्रामस्थांनी २२ मार्च २०२६ रोजी खासदार अमर काळे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन साद केले. पिनकोडमुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी त्यांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिल्या.
समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार अमर काळे यांनी तातडीने पाठपुरावा सुरू केला. २६ मार्च २०२६ रोजी त्यांनी अमरावती विभागाच्या टपाल अधीक्षकांशी पत्रव्यवहार करून ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासह विटाळा गावासाठी स्वतंत्र पिनकोड मंजूर करण्याची आग्रही मागणी केली.
अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, ४४४७०९ हा नवीन पिनकोड मंजूर झाला आहे. त्यामुळे विटाळा गावाची अमरावती जिल्ह्यातील स्वतंत्र टपाल ओळख आता अधिकृतपणे अधोरेखित झाली आहे. ग्रामस्थांकडून खासदार अमर काळे यांच्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
