पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशुल बन्सल संयुक्त अव्वल; 715 गुणांसह देशात प्रथम
नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदा देशभरातील 551 शहरे आणि परदेशातील 14 शहरांतील 5,440 परीक्षा केंद्रांवर सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 11.21 लाख उमेदवार वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुष आणि संबंधित पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
यंदाच्या परीक्षेत पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशुल बन्सल यांनी प्रत्येकी 715 गुण मिळवत संयुक्तपणे देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पात्र उमेदवारांमध्ये 58 टक्क्यांहून अधिक मुलींचा सहभाग असून, यंदाही मुलींनी गुणवत्तेत बाजी मारल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
देशातील प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांनी 13 भाषांमध्ये ही परीक्षा दिली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश उमेदवार 17 ते 19 वर्षे वयोगटातील असल्याचे NTA ने नमूद केले आहे.
सर्व उमेदवारांचे स्कोअरकार्ड अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, राज्यनिहाय अव्वल विद्यार्थी, प्रवर्गनिहाय (SC, ST, OBC-NCL, Gen-EWS, PwBD) गुणवंत, कट-ऑफ गुण आणि भाषानिहाय सहभागाची सविस्तर माहितीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला विलंब होऊ नये, यासाठी निकाल वेळेत जाहीर करण्यात आल्याचे NTA ने स्पष्ट केले आहे. आता लवकरच देशभरातील MBBS, BDS, AYUSH आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशन (Counselling) प्रक्रिया सुरू होणार आहे.
मलकापुरात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांतून तीन बालकामगारांची मुक्तता
हेच नेते आणि प्रतिनिधी आंदोलनाची वेळ येण्यापूर्वी कुठे होते?
