राजकीय प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण; नेत्याच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष
प्रवीण थोरात
चिखली – “ना… ना करते प्यार, उसी से कर बैठे…” या गाण्याच्या ओळी सध्या चिखलीच्या राजकीय वर्तुळात चपखल बसताना दिसत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या राजकीय समीकरणाला नकार दिला जात होता, त्याच समीकरणाशी जवळीक वाढल्याच्या चर्चांनी आता पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे संबंधित नेत्याचा संभाव्य पक्षप्रवेश हा जिल्ह्याच्या राजकारणातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही पक्षबदलाच्या चर्चांना अनेकदा उधाण आले होते. मात्र, प्रत्येक वेळी संबंधित नेत्याकडून या चर्चांना स्पष्ट नकार देण्यात आला. त्यामुळे समर्थकांपासून विरोधकांपर्यंत सर्वांनीच या चर्चांकडे केवळ राजकीय अफवा म्हणून पाहिले. मात्र, अलीकडच्या राजकीय हालचालींमुळे या चर्चांना पुन्हा बळ मिळाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या संभाव्य राजकीय घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संबंधित नेत्याचा निर्णय झाल्यास केवळ पक्षबदल होणार नाही, तर मतदारसंघातील विद्यमान राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, “ज्यांना कालपर्यंत नकार, त्यांच्याशीच आज राजकीय जवळीक?” असा सवाल राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे. त्यामुळे ‘ना… ना’ म्हणणारा नेता अखेर कोणाच्या प्रेमात पडतो, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. माजी आमदार तथा माजी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली असून, १३ ऑगस्ट रोजी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत झालेल्या पक्ष पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि नगरसेवकांच्या बैठकीमुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मात्र, राहुल बोंद्रे यांनी अद्याप याबाबत मौन बाळगले आहे.
राहुल बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा चिखली मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. यापूर्वी अनेकदा या चर्चांना उधाण आल्यानंतर बोंद्रे यांनी स्वतः भाजप प्रवेशाच्या शक्यता फेटाळून लावत आपण काँग्रेसमध्येच असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे ‘राहुलभाऊ भाजपमध्ये जाणार’ ही चर्चा अनेकदा राजकीय अफवांच्या पातळीवरच राहिली.
मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र आहे. ९ ऑगस्टपासून या चर्चेला प्रत्यक्ष राजकीय हालचालींची किनार मिळाल्याचे बोलले जात असून, १३ ऑगस्टला प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची चर्चा आहे. या प्रवेशाबाबत राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांना स्वतः माहिती दिल्याचे आणि ‘पर्याय राहिला नसल्याचे’ सांगितल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी तालुक्यातील काही स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतल्याची माहितीही समोर येत आहे.
भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक
चिखलीतील श्रीराम नागरी पतसंस्थेच्या सभागृहात भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत पक्ष पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बोंद्रे यांनीही नगरसेवकांची बैठक घेतली
दुसरीकडे, माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी चिखली नगरपालिकेतील नगरसेवकांची बैठक घेतल्याचे समजते. एकाच कालावधीत भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक आणि बोंद्रे यांची नगरसेवकांसोबतची बैठक झाल्याने राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
आता १३ ऑगस्टला राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश प्रत्यक्षात होतो का, याकडे चिखलीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बोंद्रे यांच्या प्रवेशामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि भाजपच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बोंद्रे भाजपमध्ये गेल्यानंतर ‘साथ सोडणाऱ्यां’चे काय?
राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्या राजकीय प्रवासात यापूर्वी साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची राजकीय भूमिका चर्चेचा विषय ठरणार आहे. बोंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस सोडलेल्यांना आता पुन्हा त्यांच्यासोबत येण्याची संधी मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे, बोंद्रे यांच्या विरोधात जाऊन भाजपमध्ये स्थिरावलेल्या पदाधिकाऱ्यांसमोरही नव्या समीकरणाचे आव्हान निर्माण होऊ शकते. भाजपमध्ये बोंद्रे यांचे स्थान मजबूत झाल्यास जुन्या समर्थकांना पुन्हा जवळ केले जाणार की पक्षांतर्गत नव्या गटबाजीला सुरुवात होणार, याकडे चिखलीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे बोंद्रे यांच्या प्रवेशानंतर ‘कोण कुणाच्या सोबत?’ हे समीकरण अधिक रंगणार आहे.
