बुलढाणा (प्रतिनिधी): बुलढाणा–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दुधा गावाजवळ अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या प्रसिद्ध मर्दडी देवस्थानात प्रथमच धाडसी चोरीची घटना घडली असून, देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. इतिहासकालीन व जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या मंदिरातील चोरीमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलेले दृश्य. चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी बाहेर चप्पल काढल्या, देवीचे दर्शन घेतल्याचा आव आणला आणि त्यानंतर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केली. देवस्थानातच श्रद्धेचा आव आणत चोरी केल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्याचे कुलूप फोडून देवीच्या अंगावरील चार सोन्याचे मंगळसूत्र, डोक्यावरील चांदीचा टोप आणि चांदीच्या पादुका असा मौल्यवान ऐवज चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजिनाथ मोरे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत ठाकरे तसेच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सीसीटीव्ही फुटेज, चोरट्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी वेगवेगळ्या दिशांना दोन तपास पथके रवाना केली आहेत. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजिनाथ मोरे व त्यांचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. दरम्यान, जागृत देवस्थानातील या चोरीचा तातडीने छडा लावून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून होत आहे.
अकोला जिल्ह्यात शिक्षक बदली घोटाळा; बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणारे ३३ शिक्षक निलंबित
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; विदर्भातील अनेक पदाधिकाऱ्यांना संधी
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन
