मेहकर नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील कथित दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त. मुलाच्या जन्मदाखल्यासाठी महिनाभर हेलपाटे मारल्यानंतर एका नागरिकाने आत्मदहनाचा इशारा दिला.
मेहकर नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात दिरंगाई; नागरिकांकडून चौकशी व तत्काळ कारवाईची मागणी
मेहकर, दि. १ : मेहकर नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील कथित दिरंगाईमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. आवश्यक दाखले वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून, विभागाचे कामकाज संथ गतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर एका नागरिकाने आत्मदहनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.
मेहकर येथील शेषराव लंबे यांनी आपल्या मुलाच्या जन्मदाखल्यासाठी गेल्या महिनाभरापासून नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप केला आहे. अनेक वेळा कार्यालयात जाऊनही त्यांच्या अर्जावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसून केवळ टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
वेळेत जन्मदाखला मिळाला नाही तर मुलाच्या शैक्षणिक प्रवेशावर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेषराव लंबे यांनी, “पुढील दोन ते तीन दिवसांत माझे काम झाले नाही, तर मी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करीन,” असा गंभीर इशारा दिला आहे.
दरम्यान, जन्म-मृत्यू विभागात इतर अनेक नागरिकांचीही कामे वेळेत होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. आवश्यक दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणाची चौकशी करून जन्म-मृत्यू विभागातील दिरंगाई दूर करावी तसेच नागरिकांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
लोणारात ठाकरे गटाला मोठे खिंडार?; युवासेनेतील सामूहिक राजीनाम्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
चांडोळ येथे बुलढाणा बाजार समितीचा उपबाजार होणार; शासनाकडून ५ एकर जागा मंजूर
