National Satsang Mahaparva to be held in Sindkhedraj on Tuesday
सभा मंडप व नियोजनासाठी युद्धपातळीवर काम सुरू
बातमीविश्व टिम सिंदखेडराजा
मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत मंगळवार, दि.२० मे रोजी जागर श्री शक्तीचा, गजर राष्ट्रभक्तीचा या घोषवाक्याखाली राष्ट्रीय महासत्संग मेळावा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. हा सत्संग मेळावा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक जागृती, राष्ट्रभक्ती व महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी होणार्या या मेळाव्याचे आयोजन सर्व स्तरांवर जोरदारपणे सुरू असून, सभा मंडपाची उभारणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
मागील काही दिवसांपासून सभा मंडप व नियोजनासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून, या पार्श्वभूमीवर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व प्रशासकीय अधिकारी यांनी मेळाव्याच्या स्थळाची पाहणी केली. या पाहणीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुनील कायंदे, माजी जि.प. अध्यक्षा नंदाताई कायंदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विष्णू मेहेत्रे, माजी नगराध्यक्ष सौ. नंदाताई मेहेत्रे व सतीश तायडे, शिवसेनेच्या डॉ. भाग्यश्री खेडेकर, शिंदे गटाचे विधानसभा अध्यक्ष शिवप्रसाद ठाकरे, माजी नगरसेविका शारदाताई जायभाये, ज्येष्ठ समाजसेवक सुभाष दराडे यांचा सहभाग होता.
प्रशासनाच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, तहसीलदार अजित दिवटे, नगरपरिषद प्रशासक आशिष बोबडे, ठाणेदार ब्रह्मदेव शेळके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे देशमुख यांच्यासह इतर अधिकार्यांनी वीज, रस्ते, पाणी, वाहन पार्किंग, सुरक्षितता आणि गर्दी नियंत्रण आदी बाबींवर काटेकोर नियोजनाची अंमलबजावणी केली. सिंदखेडराजात या भव्य आयोजनामुळे उत्साहाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
