मुख्य मागण्या
- सुधारित सेवा प्रवेश नियम तातडीने अंतिम करावेत.
- सुधारित आकृतिबंधाला मंजुरी देऊन नवीन पदनिर्मिती करावी.
- प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.
- रिक्त पदांवरील सरळ सेवा भरती सुरू करावी.
- परिचारिका संवर्गाच्या सर्व प्रलंबित सेवाविषयक प्रश्नांवर कालबद्ध निर्णय घ्यावा.
राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांचा उत्स्फूर्त सहभाग; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी): सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाच्या प्रलंबित सेवाविषयक मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या राज्यव्यापी आंदोलनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन, जिल्हा शाखा बुलढाणा यांच्या वतीने मंगळवारी (४ ऑगस्ट) राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दोन तासांचे कामबंद आंदोलन करण्यात आले. सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत परिचारिकांनी कामकाज बंद ठेवून शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
आंदोलनकर्त्यांनी सुधारित सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतिबंध, पदोन्नती प्रक्रिया आणि सरळ सेवा भरती तातडीने अंतिम करण्याची मागणी केली. शासनाने वारंवार पाठपुरावा करूनही या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेने केला.
१५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रमही निष्फळ
संघटनेच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र शासनाने २ जून २०२५ रोजी जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सेवा प्रवेश नियम, पदोन्नती, सुधारित आकृतिबंध आणि रिक्त पदांची भरती निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, मुदत संपूनही परिचारिका संवर्गाच्या महत्त्वाच्या सेवाविषयक बाबी अद्याप प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
रुग्णसेवेवरही परिणाम
सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम न झाल्याने हजारो परिचारिका पदोन्नतीपासून वंचित असल्याचे संघटनेने म्हटले आहे. तसेच सुधारित आकृतिबंधाला मंजुरी न मिळाल्यामुळे नवीन पदनिर्मिती आणि भरती रखडली असून विद्यमान परिचारिकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे शासकीय रुग्णालयांतील रुग्णसेवेवरही विपरीत परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला.
तीव्र आंदोलनाचा इशारा
शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही आणि मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या जिल्हाध्यक्ष जयश्री वाघ आणि जिल्हा सरचिटणीस मंगेश शिरसाठ यांनी दिला. या आंदोलनात बुलढाणा जिल्ह्यातील परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सरकारी डॉक्टरांना प्रायव्हेट प्रॅक्टिसला ‘नो’; उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
बुलढाण्यात अवैध गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश; दुसऱ्यांदा छापा, डॉक्टर व मुलगा ताब्यात
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रलंबित गोदाम भाड्यासाठी प्रतापराव जाधवांचा पाठपुरावा
डॉ. सर्जेराव वाघ यांच्या पीएच.डी. प्राप्तीबद्दल दुसरबीड महाविद्यालयात सत्कार
गुरुपौर्णिमेला नाना पटोले यांचे दुधाने पाद्यपूजन; व्हिडिओ व्हायरल, राजकीय वादाला तोंड
