मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मे. गार्गी हुट्टेनेस अल्बर्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील पात्र कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्राधान्याने राबविण्याचे निर्देश राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले. कंपनीतील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.विधान परिषद सदस्य भाई जगताप यांच्या निवेदनानंतर आयोजित या बैठकीत कंपनीतील सुमारे ३०० कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेणे, तसेच समान कामासाठी समान वेतन आणि सुविधा देण्याची मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली.
बैठकीला भाई जगताप, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, उपसचिव (कामगार) स्वप्निल कापडणीस, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड, कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, कामगारांचे हित आणि त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. समान कामासाठी समान वेतन या तत्त्वानुसार कंपनीने कामगारांच्या तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करावी. कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही, याची शासन पूर्णपणे दक्षता घेईल.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी कायदेशीर तरतुदींनुसार सर्व बाबींची तत्परतेने तपासणी करून विहित वेळेत अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
मंत्री फुंडकर यांनी कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापनाने सामोपचाराने व सकारात्मक चर्चेतून हा प्रश्न सोडवावा, असे आवाहन केले. कायमस्वरूपी सेवेसाठी पात्र असलेल्या कामगारांना प्राधान्याने कायम सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया राबवावी, कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन हा प्रश्न कालबद्ध पद्धतीने निकाली काढावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
पदाधिकाऱ्यांनी जनसामान्यांचा विश्वास संपादन करावा; नरेश शेळके यांचे आवाहन
मतदारयादी पुनरीक्षणाच्या वेळापत्रकात बदल; अंतिम यादी २७ ऑक्टोबरला
