The family of Kailash Nagare, who sacrificed his life for agricultural water, should be given Rs 25 lakh as assistance – Farmer leader Prakash Pohare
अंढेरा फाटा येथे तीन तास रास्ता रोको
बातमीविश्व टिम
शेतीच्या पाण्यासाठी प्राणाची आहुती देणारे कैलास नागरे Kailash Nagare यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने २५ लाखांची मदत द्यावी, खडकपूर्णाचे पाणी या भागातील १४ दुष्काळग्रस्त भागासाठी तातडीने सोडावे, या भीषण परिस्थितीला व नागरे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या तहसीलदारांसह सर्व अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. यासह इतर शेतकरीहितांच्या मागण्यांसाठी लोकनायक, शेतकरी नेते तथा दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी अंढेरा फाटा येथे तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केला.
या आंदोलनाने घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. रस्त्याच्या दुतर्फा वाहने थांबून होती. अखेर राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) आमदार मनोज कायंदे तसेच शिवसेना उबाठा गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्तीने व तहसीलदार मनीषा कदम यांनी आंदोलनस्थळी येऊन दिलेल्या ठोस आश्वासनामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रश्नी उद्या शुक्रवारी जिल्हाधिकारी किरण पाटील जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी प्रकाश पोहरे यांच्यासोबत बैठक लावली आहे.
या आंदोलना दरम्यान प्रकाश पोहरे म्हणाले की, राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात शेतकर्यांच्या प्रश्नांवर एकाही आमदाराने आवाज उठविला नाही. एकीकडे पाणी आहे, सिंचनाच्या सोयी आहेत, पण गलथान प्रशासकीय कारभार पाणी सोडायला तयार नाही. त्यामुळे राज्यपालांच्या हस्ते उत्कृष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त केलेल्या युवा शेतकरी कैलास नागरे यांना आत्महत्या करावी लागली. देशात आणि राज्यात नाकर्ते सरकार सत्तेवर असून, हे सरकार शेतकर्यांचे दुश्मन आहे. सोयाबीन, कापसाला भाव नाही, हमीदराने या पिकांची खरेदी शासनाने थांबवली आहे.
सोयाबीन व कापसाचे चुकारे अद्याप दिले नाहीत. हक्काचा पीकविमादेखील या सरकारने दिला नाही. हे सरकार फुकट्या योजनांवर पैशाची निव्वळ उधळपट्टी करत असून, शेतकर्यांना द्यायचा म्हटला तर मात्र यांच्याकडे पैसा नाही. स्व.कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांना तातडीने २५ लाख रूपये द्यावेत, शेतकर्यांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, तहसीलदारांसह सर्व संबंधित अधिकार्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या प्रकाश पोहरे यांनी केल्या. प्रकाशभाऊ पोहरेंच्या या आंदोलनात परिसरातील असंख्य शेतकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्याने या रस्ता रोको आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळाले होते. अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार रूपेश शक्करगे यांनी प्रकाश पोहरेची समजूत काढण्याचा प्रयत्न चालवला होता. या आंदोलनापूर्वी प्रकाश पोहरे व त्यांच्या सहकार्यांनी शिवनी अरमाळ ता.देऊळगावराजा येथे जात नागरे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
या आंदोलनात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख दादाराव खार्डेे, गजानन घुगे, पत्रकार सुषमा राऊत, भीमराव चाटे, भाजप नेते भगवानराव मुंडे, भगवानराव नागरे, गणेश नागरे, विठोबा मुंडे, गणेश सानप, खंडू मांटे, शिवानंद शिंदे, उद्धव शिंगणे, गणेश आंधळे यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे, आझाद हिंद संघटनेचे अॅड. सतीशचंद्र रोठे यांची उपस्थिती होती.
