बुलडाणा, दि. ३ सप्टेंबर २०२६ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व स्त्री रुग्णालय, बुलडाणा येथे गुरुवारी (दि. ३) रुग्णालयातील फायर सिस्टीमची तांत्रिक तपासणी व टेस्टिंग करण्यात आली. रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था कार्यक्षम आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्पर राहावी, या उद्देशाने ही तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ. प्रशांत पाटील, डॉ. भुसारी, रुग्णालयातील स्टाफ तसेच उपअभियंता वाडीभस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक टीमने फायर सिस्टीमची पाहणी केली. तांत्रिक टीममध्ये देवानंद ताठे, गोपाल भोयर, महेंद्र केसपागे यांच्यासह फायर सिस्टीमचे निखिल नवरंगे यांचा सहभाग होता.
तपासणीदरम्यान फायर सिस्टीमच्या विविध घटकांची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. रुग्णालयात आग किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अग्निसुरक्षा यंत्रणा तातडीने कार्यान्वित होणे आवश्यक असल्याने अशा प्रकारच्या नियमित तांत्रिक तपासणीला विशेष महत्त्व आहे.

