आठव्या वेतन आयोगात मोठे बदल? केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारवाढीसोबत कोणते एरिअर्स मिळणार?
आठव्या वेतन आयोगामुळे मूळ वेतन आणि पेन्शनमध्ये सुधारणा होण्याची शक्यता असली तरी DA, HRA, LTC आणि CEA यांसारख्या प्रत्येक भत्त्याची मागील कालावधीतील थकबाकी मिळेल, असे सध्या निश्चितपणे म्हणता येणार नाही. अंतिम निर्णय सरकारच्या अधिसूचनेनंतरच स्पष्ट होईल.
नवी दिल्ली : आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रतीक्षा करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसह निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आठवा केंद्रीय वेतन आयोग वेतन, भत्ते आणि पेन्शनसह विविध बाबींवर शिफारशी करणार आहे. आयोगाला आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
दरम्यान, पेन्शन कम्युटेशनच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे. ‘नॅशनल कौन्सिल ऑफ द जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी’ (NC-JCM) च्या कर्मचारी पक्षाने कम्युटेड पेन्शनची पुनर्स्थापना करण्याचा सध्याचा १५ वर्षांचा कालावधी कमी करून ११ वर्षे करण्याची मागणी केली आहे. सध्या निवृत्तीच्या वेळी मूलभूत पेन्शनपैकी कमाल ४० टक्के रक्कम कम्युट करता येते आणि त्यानंतर कपात झालेली पेन्शन १५ वर्षांनी पूर्ववत होते.
पगारवाढ झाली तरी सर्व भत्त्यांचे एरिअर्स मिळतील का?
आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर मागील कालावधीतील थकबाकीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, मूळ पगाराच्या थकबाकीसोबत प्रत्येक भत्त्याची त्याच कालावधीची थकबाकी मिळेलच असे नाही. मागील वेतन आयोगांच्या पद्धतीनुसार काही भत्ते सुधारित वेतन लागू झाल्याच्या तारखेपासून लागू होण्याची शक्यता असते. त्यामुळे HRA, Transport Allowance यांसारख्या भत्त्यांच्या मागील कालावधीतील थकबाकीबाबत निश्चित निर्णय सरकारच्या अंतिम अधिसूचनेनंतरच स्पष्ट होईल.
महत्त्वाचे म्हणजे सध्या आठव्या वेतन आयोगाने अंतिम वेतनश्रेणी, फिटमेंट फॅक्टर किंवा भत्त्यांच्या एरिअर्सबाबत अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे सोशल मीडिया किंवा विविध संकेतस्थळांवर फिरणारे निश्चित आकडे अधिकृत समजणे योग्य ठरणार नाही.
आठव्या वेतन आयोगातून काय-काय बदलणार?
वेतन आयोगाचा विषय केवळ मूळ पगारवाढीपुरता मर्यादित नसतो. आयोगाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनरचना, भत्ते, पेन्शन आणि सेवा अटींचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार नवीन वेतनश्रेणी, पे मॅट्रिक्स, फिटमेंट फॅक्टर, विविध भत्ते आणि निवृत्तीवेतनाशी संबंधित नियमांमध्ये बदलांच्या शिफारशी होऊ शकतात.
त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाकडून केवळ पगारवाढीचीच नव्हे, तर भत्ते आणि पेन्शनच्या नियमांमध्येही महत्त्वपूर्ण बदलांची अपेक्षा आहे. मात्र, अंतिम लाभ किती मिळणार हे आयोगाच्या शिफारशी आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच निश्चित होईल.
एकीकडे शाळा, दुसरीकडे टीईटीचा अभ्यास; सरकार शिक्षकांची आणखी किती परीक्षा पाहणार?
