विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक; आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर रोहित पवारांची नाराजी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध मागण्यांसाठी पुण्यात गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून, धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांच्याकडे एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलनकर्त्यांसह आमदार रोहित पवार यांची भेट घेतली. यावेळी सरकारने मान्य केलेल्या मागण्यांचा मसुदाही त्यांनी रोहित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
मात्र, सरकारकडून देण्यात आलेल्या मसुद्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही उल्लेख नसल्याने रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करताना आयोगाच्या अध्यक्षांबाबतची मागणीही मान्य करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्याकडे चौकशी समितीच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविण्याच्या घोषणेमुळे आंदोलनाच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसह आंदोलनातील सर्व मुद्द्यांवर सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये एकमत होते का, याकडे आता लक्ष लागले आहे.
सहकारातून समृद्धीचा मंत्र देणारे लोकनेते स्व. भास्कररावजी शिंगणे
