
प्रवीण थोरात
बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांची साथ सोडणार नाही, अशी भूमिका घेत पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी झटलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये आता नाराजीची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, पक्ष सोडून गेलेल्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास कायम असल्याचे बोलले जात असले, तरी जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांच्या कार्यपद्धतीबाबत मात्र नाराजीची चर्चा बुलढाणा जिल्हयातील शरद पवार राष्ट्रवादीगटामध्ये बोलल्या जात आहे.
राष्ट्रवादी फुटीनंतरची परिस्थिती शरद पवार गटासाठी अत्यंत प्रतिकूल होती. अनेक बडे नेते आणि पदाधिकारी अजित पवारांच्या गटात गेल्यानंतर जिल्ह्यात पक्षाची संघटना टिकविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. अशा वेळी काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सत्तेची समीकरणे न पाहता शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. संघटना उभी करण्यासाठी त्यांनी गावोगावी संपर्क केला, कार्यकर्त्यांना जोडले आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवली. मात्र आता याच कार्यकर्त्यांपैकी काहीजण पक्षापासून दूर गेल्याने प्रश्न उपस्थित होत आहे.
शरद पवार साहेबांवर निष्ठा, स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?
राजकारणात पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व आणि स्थानिक संघटनात्मक नेतृत्व यांच्यातील फरक महत्त्वाचा असतो. बुलढाण्यातील सध्याच्या परिस्थितीत हेच चित्र स्पष्ट दिसून येत आहे. काही कार्यकर्त्यांची नाराजी पक्षाच्या विचारसरणीविरोधात नसून स्थानिक पातळीवरील निर्णयप्रक्रिया, पदाधिकार्यांशी संवाद, ज्येष्ठांना मिळणारे स्थान आणि संघटनात्मक पद्धतीशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार साहेबांवर आमचा विश्वास आहे; मात्र जिल्ह्यात पक्ष चालवण्याच्या पद्धतीबाबत आम्ही समाधानी नाही, अशी भूमिका काही नाराज कार्यकर्त्यांची असल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जाते. मात्र या भूमिकेला संबंधित कार्यकर्त्यांची अधिकृत अशी पुष्टी मिळणे आवश्यक आहे.
ज्यांनी पक्ष वाचवला, तेच दुरावले तर?
पक्षफुटीनंतर शरद पवार गटाची खरी ताकद ही जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये होती. प्रतिकूल परिस्थितीतही या कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडली नाही. त्यामुळे आता त्यांच्यापैकी काहीजण दुरावणे ही केवळ पदाधिकार्यांची बदलती राजकीय भूमिका नसून संघटनेसाठी चिंतेचा विषय ठरू लागल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जर आपण पक्षाचे आधारस्तंभ आहोत, असे वाटण्याऐवजी आपल्याला डावलले जात आहे, अशी भावना निर्माण झाली तर त्याचा परिणाम तळागाळातील कार्यकर्त्यांवरही होऊ शकतो.
नरेश शेळकेंसमोर विश्वासाचे संकट?
नवतरुण समजल्या जाणार्या नरेश शेळकेंना कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली होती तेव्हा वरकरणी साहेबांचा वा औपचारिकरित्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा निर्णय असला तरी यामध्ये ताईंचा मोठा वाटा असल्याचे शेळकेंच्या नियुक्ती वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये चर्चा रंगल्या होत्या. बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून नरेश शेळके यांच्यासमोर आता केवळ पक्ष वाढविण्याचे आव्हान नाही, तर ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करण्याचीही मोठी कसोटी आहे. नवे नेतृत्व उभे करणे आवश्यक आहे; मात्र पक्षफुटीनंतर कठीण काळात पक्षासोबत राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान आणि सहभाग कायम ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नव्या-जुन्या नेतृत्वामध्ये समन्वयाचा अभाव राहिला तर नाराजीचे रूपांतर गटबाजीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पवारांनी स्थानिक नाराजीची दखल घेण्याची गरज
बुलढाण्यातील परिस्थितीवरून एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वावरील निष्ठा आणि स्थानिक नेतृत्वाबाबतची नाराजी या दोन वेगळ्या गोष्टी असल्यातरी पवार साहेबांचा पक्ष सोडून गेलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला पवारविरोधी ठरविण्यापेक्षा त्यांच्या नाराजीचे कारण समजून घेणे राष्ट्रवादीसाठी अधिक महत्त्वाचे ठरेल. वरिष्ठ नेतृत्वाने नाराज ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला, त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि स्थानिक संघटनेत समन्वय निर्माण केला, तर परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. कारण निवडणुकीच्या वेळी केवळ पक्षाचे चिन्ह किंवा नेत्याचे नाव पुरेसे नसते; गावागावातील कार्यकर्ता, त्याचे नेटवर्क आणि मतदारांशी असलेला थेट संपर्क हीच पक्षाची खरी ताकद असते. बुलढाण्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटासमोर आजचा प्रश्न केवळ कोण पक्ष सोडत आहे? एवढाच नाही. त्यापेक्षा मोठा प्रश्न आहे जे शरद पवारांसोबत राहिले, त्यांना पक्षात आपले स्थान आणि भवितव्य सुरक्षित वाटते का?
डिजिटल अरेस्ट प्रकरणात बुलढाणा सायबर पोलिसांची मोठी कारवाई; ५२.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
