भादोला परिसरात धार्मिक व सामाजिक उपक्रम; जिल्ह्यातील बौद्ध उपासक-उपासिकांना उपस्थितीचे आवाहन
बाबासाहेब जाधव
बुलढाणा : मातृतीर्थ बुलढाणा शहराची ओळख आंबेडकरी चळवळीसोबतच धार्मिक आणि सामाजिक चळवळींचे केंद्र म्हणून आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे भन्ते यश यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहराला बौद्ध धार्मिक चळवळीचे केंद्र म्हणून देशभरात ओळख मिळावी, या उद्देशाने ‘बुद्ध रश्मी महाविहार, बुलढाणा’ या महत्त्वाकांक्षी धार्मिक व सामाजिक उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे.
या महाविहाराच्या माध्यमातून बौद्ध धर्मातील विविध धार्मिक विधी, धम्मप्रशिक्षण तसेच सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या महाविहाराचा भूमिपूजन अर्थात शिलान्यास सोहळा शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी बुलढाणा-खामगाव मार्गावरील भादोला परिसरात आयोजित करण्यात आला आहे.
या शिलान्यास सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक-उपासिकांना आयोजकांच्या वतीने निमंत्रित करण्यात आले आहे. दिवसभर विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता भूमिपूजनाने होईल. त्यानंतर १०.१५ वाजता शिलान्यास, तर ११ वाजता महासंघदान होणार आहे. दुपारी १ वाजता परित्राण पाठ, २ वाजता वृक्षारोपण, तर २.४५ वाजता पुण्यानुमोदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ३ वाजता उपासक-उपासिकांसाठी भोजदान देण्यात येणार असून, त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. या शिलान्यास सोहळ्यास परमपूज्य गुरु भन्तेजी तसेच विविध भिक्षुसंघातील उदित ज्ञान भन्ते, ज्ञान रक्षित भन्ते, मैताजी भन्ते, विवेक भन्ते, शांतीवित भन्ते, यश भन्ते आणि धम्ममित्र भन्ते यांच्यासह आदरणीय भिक्षुसंघाची उपस्थिती राहणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बौद्ध उपासक-उपासिकांनी पांढरे वस्त्र परिधान करून या धम्म सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. बौद्ध धम्मात ‘धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान’ मानले जाते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या ऐपतीनुसार तन-मन-धनाने धम्मदान करावे, असे आवाहन महाविहाराचे संयोजक तथा कार्यक्रमाचे आयोजक भन्ते यश यांनी केले आहे.
भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रसार, धम्म चळवळीला बळकटी देणे तसेच समाजात शांतता, समता आणि बंधुभावाचा संदेश पोहोचविण्याच्या दृष्टीने बुद्ध रश्मी महाविहाराचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. बुलढाणा शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर, बुलढाणा-खामगाव रोडवरील भादोला परिसरात हा शिलान्यास सोहळा होणार आहे. या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
