चिखली- नगर परिषद नगराध्यक्षपदाची निवडणूक आता केवळ स्थानिक स्तरावरील लढत राहिली नसून, थेट मुख्यमंत्र्यांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पंडित देशमुख यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २५ नोव्हेंबर रोजी चिखली शहरात भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नियोजित ऐतिहासिक सभेमुळे संपूर्ण चिखलीचे वातावरण भाजपमय झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचे राजकीय महत्त्व असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःपंडितराव देशमुख यांच्या प्रचारासाठी चिखलीत येत आहेत, ही बाब या निवडणुकीचे राजकीय महत्त्व अधोरेखित करते. मुख्यमंत्री फडणवीस हे नेहमीच विकासाला आणि पारदर्शक प्रशासनाला महत्त्व देतात, हे विकासावरून सिद्ध झाले आहे. आता तर त्यांच्या उपस्थितीमुळे चिखलीच्या जनतेला हाच थेट संदेश मिळत आहे.
पंडितराव देशमुख यांची उमेदवारी भाजपसाठी मोठी जमेची बाजू आहे. अनेक वर्षांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी उच्च नैतिक मूल्यांचे पालन केले असून, त्यांच्यावर कोणताही राजकीय वाद किंवा भ्रष्टाचाराचा डाग नाही. हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे.
