चिखली (प्रतिनिधी): अंबिका अर्बन बँक, चिखलीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲड. विजयकुमार कोठारी यांना त्यांच्या सामाजिक व लोकहितवादी कार्याची दखल घेत आंतरराज्यीय ख्यातीप्राप्त बहुजन साहित्य संघ, चिखली यांच्या वतीने आयोजित सातव्या बहुजन साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. हे संमेलन दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी संतनगरी पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
चिखली नगरपालिकेचे सदस्य असताना आठवडी बाजार परिसरातील वर्षानुवर्षे ‘फुकटपुरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झोपडपट्टी भागातील गोरगरीब, मजूर व सामाजिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या अतिक्रमित व विस्कळीत वास्तव्यास नियमानुसार घरकूलसदृश स्वरूप देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. याशिवाय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव म्हणून त्यांना हे निमंत्रण देण्यात आले आहे.
बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे आणि पदाधिकारी भावकवी अंकुश पडघान यांनी दि. ३१ जुलै २०२६ रोजी ॲड. कोठारी यांना सन्मानपूर्वक निमंत्रणपत्र प्रदान केले.
या साहित्य संमेलनात संविधान दिंडी, रांगोळी स्पर्धा, ग्रंथ व चित्र-काव्य प्रदर्शनी, परिसंवाद, कथाकथन, पुस्तक प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘फुले-शाहू-आंबेडकर पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय ठराव वाचन व समारोप अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लेखक, कवी, कथाकार व साहित्यप्रेमींनी संमेलन नियोजक रवि पुष्पा वसंत सोनार (मो. ९९२२५१४३००) तसेच सचिव डॉ. डी. व्ही. खरात (मो. ७७४४८११९८२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बहुजन साहित्य संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
संविधान सप्ताहानिमित्त सिंदखेडराजात भव्य संविधान जनजागृती रॅली; संविधान मूल्यांचा जागर
वाशिममध्ये एफडीएची धडक कारवाई; १.१३ कोटींचा गुटखा जप्त, मुख्य आरोपींवर मोक्का
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; विदर्भातील अनेक पदाधिकाऱ्यांना संधी
