नवी दिल्ली : भारतात १२ आणि १३ सप्टेंबर रोजी १८व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. भारत मंडपम येथे परिषदेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात दाखल झाले असून, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हेही भारत दौऱ्यावर येणार आहेत.
जागतिक राजकारणातील बदलते सत्तासमीकरण, अमेरिका-चीन व्यापार आणि सामरिक तणाव, युक्रेन युद्ध तसेच ‘ग्लोबल साऊथ’चा वाढता प्रभाव या पार्श्वभूमीवर यंदाची ब्रिक्स परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
ब्रिक्स परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. जिनपिंग तब्बल सात वर्षांनंतर भारत दौऱ्यावर येत आहेत. तसेच इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या उपस्थितीचीही शक्यता आहे.
विशेष म्हणजे रशिया, चीन, भारत आणि इराण या चारही देशांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांशी विविध मुद्द्यांवर मतभेद आहेत. त्यामुळे ब्रिक्स परिषदेत या देशांतील प्रमुख नेत्यांच्या भेटींकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.
शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यामुळे भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी नव्या चर्चेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, दोन्ही देशांमधील व्यापार आणि आर्थिक संबंध सुधारण्याच्या दृष्टीने अद्याप ठोस सकारात्मक संकेत स्पष्टपणे दिसून आलेले नाहीत.
या पार्श्वभूमीवर ब्रिक्स परिषदेत आर्थिक सहकार्य, व्यापार, जागतिक सत्तासमीकरण आणि ग्लोबल साऊथच्या मुद्द्यांवर होणाऱ्या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
विटाळा गावाला अखेर स्वतंत्र पिनकोडची ओळख; खासदार अमर काळेंच्या पाठपुराव्याला यश
