प्रवीण थोरात,बुलढाणा ९८८१५६३९८८
एखाद्या पदाची खरी ओळख त्या पदाला मिळालेल्या अधिकारातून नव्हे, तर त्या अधिकाराचा उपयोग किती संवेदनशीलतेने समाजाच्या हितासाठी केला जातो यावर ठरत असते. प्रशासनात राहून माणुसकीचा स्पर्श जपणारे अधिकारी समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. अशाच सेवाभावी, संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे तुकाराम मुंढे.
हम न सोचे हमे या मिला है
हम ऐ सोचे किया या है अर्पण
व्यवस्था जशीच्या तशी राहते आणि प्रश्नही तसाच राहतो प्रामाणिक अधिकारी टिकत का नाहीत? या प्रश्नाचे उत्तर केवळ राजकारणात नाही, तर समाजाच्या मानसिकतेत दडलेले आहे. प्रशासनात राहून समाजसेवेला संरक्षण देणारी, जनहिताला प्राधान्य देणारी आणि कायद्याला सर्वोच्च मानणारी काही मोजकीच व्यक्तिमत्त्वे असतात. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे तुकाराम मुंढे.
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थ्यांशी संवाद साधताना वारंवार एक गोष्ट सांगायचे तुमच्या वडिलांना सांगा, भ्रष्टाचार करू नका. देश आपोआप भ्रष्टाचारमुक्त होईल. या एका वायात संपूर्ण व्यवस्थेचे वास्तव दडलेले आहे. भ्रष्टाचार फक्त कार्यालयात जन्माला येत नाही; तो समाजाच्या मानसिकतेतून निर्माण होतो. आज आपण लाखो रुपयांची गाडी विकत घेतो, पण टोल भरताना त्रास होतो. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता घेतो, पण कर भरण्याची वेळ आली की मार्ग शोधतो. स्वच्छ शहर हवे असते, पण कचरा रस्त्यावर टाकतो. वाहतूक शिस्त हवी असते, पण सिग्नल तोडतो. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हवे असते, पण स्वतःच्या फाईलसाठी सेटिंग शोधतो. म्हणूनच तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी अनेकांना अस्वस्थ करतात. कारण ते फक्त व्यवस्थेतील दोष दाखवत नाहीत; ते समाजाचाही आरसा दाखवतात.
देशात एखादा प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, निर्भीड आणि नियमप्रिय अधिकारी आला की त्याचे कौतुक करणार्यांची संख्या अचानक वाढते. सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस पडतो. असा अधिकारी प्रत्येक जिल्ह्याला हवा, देशाला अशा अधिकार्यांची गरज आहे, सलाम या धाडसी अधिकार्याला अशा प्रतिक्रिया झळकतात. पण त्याच अधिकार्याची बदली झाल्यानंतर काही दिवसांनी सर्व काही शांत होते. त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी काम केले, तेथे नियमांचे पालन, आर्थिक शिस्त, अतिक्रमण निर्मूलन, महसूल वाढ आणि प्रशासनातील पारदर्शकता यासाठी कठोर भूमिका घेतली. त्यामुळेच ते अनेकांना आवडले आणि अनेकांना खटकलेही. खरे तर तुकाराम मुंढे हे केवळ एक अधिकारी नाहीत, तर एका विचाराचे प्रतिनिधित्व करतात. प्रशासनातील अधिकारी स्वतःची शक्ती, अधिकार आणि जबाबदारी ओळखून त्याचा जनहितासाठी वापर करू शकतो, याचे ते जिवंत उदाहरण आहेत. परंतु आपल्या समाजाला प्रामाणिक अधिकारी हवेत, पण त्यांची कार्यपद्धती मात्र नको असते. आपण भ्रष्टाचाराविरोधात बोलतो, पण स्वतःचे काम अडले की ओळख आहे का? असा प्रश्न विचारतो. आपण नियमांचे समर्थन करतो, पण नियम आपल्यावर लागू झाले की अन्यायाचा गळा काढतो. आपल्याला कायदा हवा असतो, पण तो इतरांसाठी. स्वतःसाठी मात्र अपवाद हवा असतो. भारतीय प्रशासकीय इतिहासात अनेक अधिकारी झाले. पण काहीच नावे लोकांच्या स्मरणात राहिली. भारताच्या निवडणूक आयोगाचे अनेक मुख्य निवडणूक आयुक्त होऊन गेले, पण आजही सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात राहिलेले नाव म्हणजे टी. एन. शेषन. कारण त्यांनी निवडणूक आयोगाला केवळ कार्यालय न मानता संविधानिक शक्ती म्हणून उभे केले. त्यांनी नियमांची अंलबजावणी केली आणि निवडणूक प्रक्रियेला शिस्त दिली. त्याचप्रमाणे प्रशासनात काही अधिकारी असे असतात की जे पदामुळे मोठे होत नाहीत, तर त्यांच्या कार्याुळे पदालाच प्रतिष्ठा प्राप्त होते. तुकाराम मुंढे यांच्याकडे पाहताना लोकांना अशाच प्रकारची प्रशासकीय धाडसाची आठवण होते. सज्जन नागरिक आणि जागरूक समाज एकत्र येतील, त्या दिवशी भ्रष्टाचार, अराजकता आणि दुटप्पीपणाची साम्राज्ये कोसळायला वेळ लागणार नाही. प्रामाणिक अधिकारी हा व्यवस्थेचा शत्रू नसतो; तो व्यवस्थेला लागलेल्या रोगावरचा उपचार असतो. प्रश्न एवढाच आहे की, समाजाला उपचार हवेत की रोग कायम ठेवायचा आहे?
समाजाला अशाच संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी असलेल्या व्यक्तिमत्वाची म्हणजेच तुकाराम मुंढे सारख्यां प्रशासकीय अधिकार्यांची आज गरज आहे. म्हणुनच त्यांचे हे अलौकिक कार्य आज अनेकांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरले आहे..
दिसे बिचारा साधा – भोळा |
परि ह्रदयी कार्याचा जिव्हाळा ॥
हवाहवाच वाटे सकाळा |
सेवागुणे….॥
आपत्तीमुळे बाधीत झालेल्या शेतकर्यांसाठी शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल
