संघ कार्यालयातून राष्ट्रभाव आणि समाजपरिवर्तनाचे कार्य घडते
बुलढाणा : संघ कार्यालय हे केवळ कार्यकर्त्यांच्या भेटीचे ठिकाण नसून राष्ट्रभाव निर्माण करण्याचे आणि समाजपरिवर्तनासाठी सज्जन शक्ती घडविण्याचे केंद्र आहे. संघाचा भाव जिथे पोहोचतो, तिथे राष्ट्रभाव निर्माण होतो आणि त्यातून समाजकार्याला दिशा मिळते. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, अभ्यासिका व पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानाची संधी निर्माण करणे, तसेच जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करण्याचे कार्य संघ कार्यालयातून होत असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया यांनी केले.
जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठान, चिखली यांच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बुलढाणा येथील सुदर्शन भवन, एकता नगर तसेच डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, अकोला यांच्या वतीने सुदर्शन अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा २६ ऑगस्ट रोजी सकाळी भ्रातृ मंडळ, शिवशंकर नगर, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. भाडेसिया बोलत होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, विभाग संघचालक चित्तरंजन राठी, नगर संघचालक महेश पेंडके, जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठान, चिखलीचे अध्यक्ष अरविंद आसोलकर आणि डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, अकोलाचे अध्यक्ष चंद्रशेखर राठी उपस्थित होते.
प्रारंभी भारतमाता पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अभ्यासिकेसाठी प्रशासनातील अधिकारी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि निवासी उपपोलीस अधीक्षक पावरा यांनी पुस्तके भेट दिली. त्याबद्दल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आलोक शेवडे यांनी वैयक्तिक गीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा आभासी पद्धतीने पार पडला.
मार्गदर्शन करताना डॉ. जयंतीभाई भाडेसिया म्हणाले की, संघ कार्यात किती मानधन मिळते, असा प्रश्न समाजातून विचारला जातो. मात्र संघकार्य हे मानधनासाठी नसून राष्ट्रभावनेतून केले जाते. संघ कार्यालयासमोरून जाणारा एक व्यक्ती सुरुवातीला केवळ कार्यालयातील घड्याळ दुरुस्त करण्यासाठी आला होता. पुढे आपल्या व्यस्त वेळेतून तो संघकार्यालयाला वेळ देऊ लागला आणि संघाशी जोडला गेला. राष्ट्रभाव जिथे पोहोचतो, तिथे स्वयंसेवक तयार होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
समाजातील सहभागातून शिक्षण, स्वच्छता आणि सेवा यांसारख्या विविध उपक्रमांना व्यापक स्वरूप देता येते. सुदर्शन अभ्यासिकेला अधिकाऱ्यांनी दिलेली पुस्तके ही समाजाच्या सहभागाचे प्रतिबिंब आहे. समाजाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच शिस्त आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी स्वच्छता अभियानासारखे उपक्रम राबविता येतात, असेही त्यांनी सांगितले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जुन्या स्वयंसेवकांनी त्याग आणि संघर्ष केला. प्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवून कारागृहाची शिक्षाही भोगली. त्या कार्यकर्त्यांच्या त्यागाची आणि परिश्रमांची आठवण नव्या पिढीला झाली पाहिजे. त्याग, तपश्चर्या आणि दृढनिश्चयातून संघकार्याचा प्रवास पुढे आला असून आज त्याचे सकारात्मक परिणाम समाजात दिसत आहेत. राष्ट्रकार्यात समाजाचा सहभाग वाढवून सेवा कार्य अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे डॉ. भाडेसिया यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय बुलढाणा नगर सहकार्यवाह विवेक उबरहंडे यांनी केले. आभार नगर संघचालक महेश पेंडके यांनी मानले. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करा; वैशाली खेडेकर यांचे पोलिसांना निवेदन
FD आणि ITR नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नवीन नियमांचा तुमच्यावर काय परिणाम होणार?
