मेहकर, दि. १३ : विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त १४ व १५ ऑगस्ट रोजी मतदारसंघात विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, पालखी दर्शन, महापुरुषांना अभिवादन, ध्वजारोहण तसेच प्रसिद्ध कीर्तनकार व सामाजिक प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
१४ ऑगस्ट रोजी विविध उपक्रम
वाढदिवसानिमित्त १४ ऑगस्ट रोजी लोणार येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे दर्शन आयोजित करण्यात आले आहे. वेणी, जाफराबाद, मढी (ता. लोणार) येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेहकर येथील कृषी वैभव लॉन येथे समृद्धी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यदिनीही कार्यक्रमांची रेलचेल
१५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता श्री संत गजानन महाराज पालखीचे दर्शन, सकाळी ७ वाजता श्री शारंगधर बालाजी मंदिरात दर्शन तसेच त्यानंतर पाचपीर बाबा दर्गा येथे दर्शन घेण्यात येणार आहे.
सकाळी ७.४५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी ८.३० वाजता मेहकर नगर परिषद येथे, तर सकाळी ९.३० वाजता सिंदखेड राजा येथील उत्कर्ष महाविद्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.
दुपारी १२.३० वाजता सिंदखेड राजा तालुक्यातील ताडशिवनी येथे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठरणार विशेष आकर्षण
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध कीर्तनकार व सामाजिक प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे विशेष आकर्षण राहणार आहे. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी लोणार येथील द ग्रँड वैभव लॉन येथे त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अनुसूचित जाती कल्याण समितीचा अकोला दौरा १९ व २० ऑगस्टला; विभागांची तयारी सुरू
बुलढाण्यातून संत मुक्ताईंच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू; भाविकांनी घेतले दर्शन
