वारुळी वनखंड ४९३ प्रकरणी उपवनसंरक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; के. जी. शाह यांचा इशारा
कारवाईकडे लक्ष
वनजमिनीच्या संवर्धनासाठी शासन लाखो रुपयांचा खर्च करून वृक्षारोपण करत असताना वारुळी येथील वनखंडातून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन झाल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे. या प्रकरणात संबंधित वनपाल व वनरक्षकांवर नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई होते का, याकडे आता लक्ष लागले आहे.
बुलढाणा (प्रतिनिधी) : मोताळा तालुक्यातील वारुळी शिवारातील वनखंड क्रमांक ४९३ मधील वनजमिनीतून मोठ्या प्रमाणात मुरूम (गौण खनिज) चोरी Large-scale theft of murrum (minor mineral) from forest land in Forest Compartment No. 493 within the Waruli Shivar. झाल्याचा आरोप करत संबंधित राजूर वनपाल व वारुळी वनरक्षक यांना तातडीने निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी भूमी हक्क परिषद महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. जी. शाह यांनी केली आहे. यासंदर्भात उपवनसंरक्षक, जिल्हाधिकारी आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, वारुळी शिवारातील वनखंड क्रमांक ४९३ मध्ये जेसीबीद्वारे उत्खनन करून हजारो ब्रास मुरूम काढण्यात आला. हा मुरूम एका शेतकऱ्याने आपल्या दोन शेतांमधील नाला बुजविण्यासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित वनपाल व वनरक्षक यांच्या कथित आर्थिक हितसंबंधांमुळे हे उत्खनन व गौण खनिज चोरी झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
के. जी. शाह यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्याची मागणी केली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना निलंबित करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास भूमी हक्क परिषद महाराष्ट्र संघटनेच्या वतीने १५ ऑगस्ट २०२६ पासून उपवनसंरक्षक कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.
टीप : या वृत्तातील आरोप हे भूमी हक्क परिषद महाराष्ट्र संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातील दाव्यांवर आधारित असून, संबंधित वन विभाग अथवा संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
“विद्यार्थ्यांचा आवाज दडपणारी सत्ता टिकणार नाही” : विश्वदीप पडोळ
https://batmivishwa.in/3381/
