क्रांतीदिनी जन्मभूमीत परतणार हरिदास कापसे; स्वातंत्र्यदिनी झाला होता जन्म!
मुलीच्या वाढदिवशी वडिलांचा मृत्यूशी संघर्ष; त्याच रात्री मालवली प्राणज्योत
मुलीच्या वाढदिवशी वडिलांचा मृत्यूशी संघर्ष
हरिदास यांच्या तीन वर्षीय मुलगी वैदेहीचा वाढदिवस ७ ऑगस्ट रोजीच होता. मुलीच्या वाढदिवसानिमित्त हरिदास यांनी सकाळी मोबाईलवरून तिला शुभेच्छा दिल्या, ऑनलाइन गिफ्टही पाठविले आणि स्टेटस ठेवले. सायंकाळी कुटुंबीयांनी केक कापण्याच्या वेळी त्यांना व्हिडिओ कॉल केला; मात्र तो कॉल स्वीकारला गेला नाही. त्यावेळी उत्तराखंडमध्ये हरिदास यांच्यावर उपचार सुरू होते. एका बाजूला मुलीचा वाढदिवस साजरा होत असताना दुसरीकडे वडील मृत्यूशी झुंज देत होते. अखेर त्याच रात्री ८.२६ वाजता त्यांच्या जीवनाची प्राणज्योत मालवली.
चिखली : उत्तराखंडमधील अतिउंचावरील भागात कर्तव्य बजावत असताना प्राणवायूच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा त्रास होऊन भारतीय सैन्यातील हवालदार हरिदास मधुकर कापसे (वय ३६) यांना वीरमरण आले. चिखली तालुक्यातील शेलसूरचे सुपुत्र असलेल्या कापसे यांच्या निधनाची बातमी ८ ऑगस्ट रोजी परिसरात पोहोचताच शेलसूरसह चिखलीवर शोककळा पसरली.

हरिदास कापसे यांचे पार्थिव रविवारी ९ ऑगस्ट रोजी उत्तराखंडहून दिल्लीमार्गे छत्रपती संभाजीनगर येथे आणले जाणार आहे. दुपारी १.५० वाजता विमानाने पार्थिव रवाना होऊन सायंकाळी ३.५० वाजता छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचेल. तेथे लष्करी सलामी दिल्यानंतर सोमवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पार्थिव चिखली येथे आणण्यात येणार आहे. दांडगे ले-आऊट येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात होऊन खंडाळा रोड चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे तालुका क्रीडा संकुल येथे अंत्ययात्रा पोहोचेल. सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आईचे तीन महिन्यांपूर्वीच निधन
हरिदास यांच्या मातोश्रींचे अवघ्या तीन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी वृषाली, मुलगा ऋग्वेद, मुलगी वैदेही आणि दोन भाऊ असा परिवार आहे. ऋग्वेद हा बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिरमध्ये शिक्षण घेत आहे.
स्वातंत्र्यदिनी जन्म, क्रांतीदिनी जन्मभूमीत आगमन…
हरिदास कापसे यांचा जन्म १५ ऑगस्ट १९९०, म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यदिनी झाला होता. देशाच्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेला हा जवान देशसेवेत रुजू झाला आणि अखेर देशसेवेतच प्राणांची आहुती देऊन गेला. विशेष म्हणजे ९ ऑगस्टच्या क्रांतीदिनी त्यांचे पार्थिव जन्मभूमीकडे परतत आहे. स्वातंत्र्यदिनी जन्म, क्रांतीदिनी पार्थिवाचे आगमन आणि देशसेवेत असताना मृत्यू… या योगायोगाने कापसे कुटुंबीयांसह संपूर्ण चिखलीकरांच्या डोळ्यांत अश्रू आणले आहेत.
“स्वातंत्र्यदिनी जन्मलेला जवान… देशासाठी जगला आणि देशासाठीच गेला!” हा हरिदास कापसे यांच्या जीवनप्रवासाला सलाम करणारा भावपूर्ण योगायोग ठरला आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘रक्तदान शहीदों के नाम’; २ हजार युनिट रक्तसंकलनाचा संकल्प
१,४५७ शहरी सहकारी बँकांना ‘ऑन-टॅप’ परवाना देण्याचा आरबीआयचा मार्ग मोकळा
