एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सतीश तेजनकर यांचा इशारा; १७ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करण्याची प्रशासनाकडे मागणी
१८ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
मेहकर आगारातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्मचारी प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अमरण अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे तेजनकर यांनी स्पष्ट केले आहे. १७ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १८ ऑगस्टपासून स्वतःसह मेहकर आगारातील पदाधिकारी, सभासद आणि विभागीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसह आंदोलन सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मेहकर | प्रतिनिधी
वाढदिवस विविध पद्धतीने साजरा केला जात असताना, मेहकर आगारातील एसटी वाहक आणि सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्याचे बुलढाणा विभागीय कार्याध्यक्ष सत्यनारायण परमेश्वर तेजनकर (सतीश पाटील तेजनकर) यांनी आपल्या ४०व्या वाढदिवसानिमित्त कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अमरण अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या भूमिकेला मेहकर आगारासह बुलढाणा विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
तेजनकर यांनी ३ ऑगस्ट २०२६ रोजी मेहकर आगार व्यवस्थापकांना निवेदन देत आगारातील प्रलंबित कर्मचारी प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे. १७ ऑगस्टपर्यंत मागण्या निकाली न निघाल्यास १८ ऑगस्टपासून आगार व्यवस्थापक कार्यालयासमोर अमरण अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कोणत्या आहेत प्रमुख मागण्या?
निवेदनात चालक-वाहकांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार इतरत्र कामगिरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच चालक जी. के. कुमरे यांना सेवा ज्येष्ठतेनुसार डिझेल पंपावर कामगिरी देण्यात यावी, अशी मागणी आहे. पंढरपूर यात्रेदरम्यान अतिरिक्त कामगिरी केलेल्या चालक-वाहकांना नियमानुसार साप्ताहिक सुट्टी रद्दीकरणासह इतर देय मोबदला देण्यात यावा. मेहकर-त्र्यंबकेश्वर रातराणी फेरीसाठी दोन चालकांची नियुक्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय सुपर सिक्स आणि सुपर नाईट आऊट सेवांवरील कर्मचाऱ्यांना नियमानुसार संपूर्ण ओव्हरटाईम देण्यात यावा. शनिवार, रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी किलोमीटर रद्द झाल्यामुळे कामगिरी न मिळालेल्या चालक-वाहकांना स्पेअर ड्युटी देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या इशाऱ्यामुळे एसटी प्रशासनात खळबळ उडाली असून, कर्मचारी वर्गातही आंदोलनाबाबत चर्चा सुरू झाली आहे. आता एसटी महामंडळ प्रशासन प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढून सतीश तेजनकर यांना वाढदिवसाची सकारात्मक भेट देणार की, त्यांना वाढदिवशीच अमरण अन्नत्याग आंदोलन सुरू करावे लागणार, याकडे बुलढाणा विभागातील एसटी कर्मचारी आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे. सतीश तेजनकर, सत्यनारायण तेजनकर, एसटी कर्मचारी आंदोलन, एसटी कर्मचारी संघ, मेहकर एसटी आगार, मेहकर आगार आंदोलन, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या, एसटी कर्मचारी उपोषण, अमरण अन्नत्याग आंदोलन, एसटी महामंडळ, बुलढाणा एसटी कर्मचारी, बुलढाणा विभाग एसटी, मेहकर बातम्या, एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा, वाढदिवशी उपोषण, एसटी कर्मचारी प्रश्न, चालक वाहक मागण्या, एसटी प्रशासन, मेहकर एसटी, महाराष्ट्र एसटी आंदोलन
