बुलढाणा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक यंदा केवळ संचालक निवडीची प्रक्रिया न राहता जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा आरसा ठरत आहे. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्याने सहकाराच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. एकेकाळी परस्परविरोधी राजकीय भूमिका घेणारे हे दोन्ही नेते आता एकाच संचालक मंडळात दिसणार असल्याने “विचारधारा लॉकरमध्ये ठेवून सहकाराचे नवे खाते उघडले” अशी उपरोधिक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मात्र, या निवडणुकीचे वैशिष्ट्य केवळ एवढ्यावरच मर्यादित नाही. वैध नामांकन यादीवर नजर टाकली असता सहकारात राजकारणाबरोबरच ‘परिवार’ हेही महत्त्वाचे समीकरण ठरत असल्याचे दिसून येते. पिता-पुत्र, पिता-पुत्री, भाऊ-भाऊ आणि तब्बल १७ पती-पत्नी जोडप्यांनी विविध मतदारसंघांतून अर्ज दाखल केल्याने “बिना सहकार, नाही उद्धार” या जुन्या घोषवाक्याऐवजी आता “बिना परिवार, नाही सहकार” हे नवे ब्रीदवाक्य आकार घेत असल्याची चर्चा रंगली आहे.
नात्यांची मांदियाळी
नामांकन यादीत चिखलीच्या आमदार श्वेता महाले व त्यांचे वडील अंकुशराव पाटील, प्रतापराव जाधव व भाऊ अॅड. उल्हास जाधव, धृपतराव सावळे व भाऊ राजू सावळे, तोताराम कायंदे व पुत्र शिवराज कायंदे, आमदार संजय गायकवाड व जावई मयूर बाहेकर यांच्यासह अनेक कुटुंबांतील सदस्य विविध मतदारसंघांतून रिंगणात उतरले आहेत. तसेच प्रतापराव जाधव-राजश्री जाधव, धृपतराव-पद्माबाई सावळे, विजयराज-अर्पिता शिंदे, जालिंदर-कमलताई बुधवत, गणेश-उज्ज्वला मोरे, डॉ. तेजराव-सविता नरवाडे, शांताराम-उषाबाई दाणे, गोविंद-संगीता मापारी, प्रदीप-अस्मिता हेलगे, राजू-आशा मुळे, विलास-उज्ज्वला बचाटे, विनायक-प्रतिभा टाले, विजय-सुरेखा चोपडे आणि सुभाष-आशाबाई चांदूरकर यांसारखी अनेक पती-पत्नी जोडपीही निवडणुकीच्या मैदानात आहेत.
राजकीय जाणकारांच्या मते, ही सर्व नामांकने प्रत्यक्ष निवडणूक लढण्यासाठीच असतील असे नाही. रणनीतीचा भाग म्हणून किंवा अंतिम क्षणी माघार घेऊन समन्वय साधण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे अर्ज दाखल करण्याची पद्धत सहकारात नवीन नाही.
चार-चार नामांकने
आमदार श्वेता महाले आणि वृषाली राहुल बोंद्रे यांनी प्रत्येकी चार मतदारसंघांतून अर्ज दाखल केले आहेत.
तीन मतदारसंघांत उमेदवारी
जालिंदर बुधवत, उज्ज्वला गणेश मोरे, दिलीप नाफडे, सुनिल उदयकार, गोविंद मिरगे आणि उषाताई मुंढे यांनी प्रत्येकी तीन मतदारसंघांतून नामांकन दाखल केले आहे.
३४ जणांचे दोन-दोन अर्ज
माजी आमदार राजेश एकडे, माजी आमदार विजयराज शिंदे, अर्पिता शिंदे, कमलताई बुधवत, अॅड. उल्हास जाधव, राजू सावळे, मयूर बाहेकर, इंद्रायणी पाटील, नरेंद्र खेडेकर, मनोज दांडगे, डॉ. तेजराव नरवाडे, शैलजाताई मोरे, पुरुषोत्तम वायाळ, उषाबाई दाणे, अशोक हिंगणे, नारायणराव सुसर, गोविंद मापारी, विक्रांत मापारी, श्रीकांत पवार, हिरासिंग घोती, आशा मुळे, जयश्री पुंडकर, मुक्ता पाटील, रियाजखान पठाण, राजू मुळे, दत्तात्रय भुतेकर, गणेश बुरकुले, राजेश्वर उबरहंडे, संतोष खांडेभराड, विजय वानखडे, गजानन मामलकर, दत्तात्रय पाटील आणि सुभाष चांदूरकर यांच्यासह ३४ उमेदवारांनी दोन मतदारसंघांतून अर्ज दाखल केले आहेत.
सर्वपक्षीय पॅनल उभे राहते की काही मतदारसंघांत थेट लढती
सध्या पडद्यामागे पॅनल उभारणी, जागावाटप आणि सर्वपक्षीय समन्वयाच्या हालचालींना वेग आला आहे. १२ ऑगस्टपर्यंत अर्जमाघारीची मुदत असल्याने अंतिम क्षणी अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्वपक्षीय पॅनल उभे राहते की काही मतदारसंघांत थेट लढती होतात, यावर जिल्हा बँकेच्या सत्तेचे आणि पुढील ग्रामीण राजकारणाचे चित्र अवलंबून राहणार आहे.एकंदरीत, यंदाची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक केवळ संचालक निवडीची राहिलेली नाही; तर विचारधारा, व्यवहार, परिवार आणि राजकीय रणनीती यांच्या संगमाची रंगतदार लढत ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सरकारी डॉक्टरांना प्रायव्हेट प्रॅक्टिसला ‘नो’; उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
