‘वेचलेले मोती’ पुस्तकाचे प्रकाशन; पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
खामगाव, दि. २ : ज्येष्ठ पत्रकार स्व. नागोराव गोपाळराव अनोकार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनोकार परिवारातर्फे दिला जाणारा स्व. ना. गो. अनोकार उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२६ यंदा बुलडाणा येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांना प्रदान करण्यात आला. याच प्रसंगी स्व. न. गो. अनोकार यांच्या सुविद्य पत्नी उषा नागोराव अनोकार यांनी संकलित केलेल्या ‘वेचलेले मोती’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
वारकरी भवन, चोपडे यांचा मळा, खामगाव येथे झालेल्या या सोहळ्याला अपर पोलीस अधीक्षक पियुष विलास जगताप, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, प्रेस क्लब खामगावचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर भोसले तसेच खरेदी-विक्री संघाच्या संचालिका प्रमिलाताई बळीराम वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्व. नागोराव गोपाळराव अनोकार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. दुर्गेश नागोराव अनोकार यांनी पुरस्कार स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करत स्व. अनोकार यांच्या मूल्याधिष्ठित पत्रकारितेच्या वारशाचे जतन करण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता क्षितीज अनोकार यांनी वडिलांच्या संस्कारांचा आपल्या जीवनावर झालेला प्रभाव आणि समाजातील कुटुंबाच्या वाटचालीविषयी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर रु. २१ हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन राजेंद्र काळे यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा सन्मान स्व. न. गो. अनोकार यांच्या स्मृतींना अर्पण करत आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर ‘वेचलेले मोती’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तकाच्या निर्मितीत विवेक बेन्दरकर यांचे मोलाचे योगदान असल्याचा उल्लेख ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांनी केला. सलग दुसऱ्या वर्षीही पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड झाल्याचे समाधान व्यक्त करत त्यांनी विवेक बेन्दरकर यांच्या विशेष सत्काराची सूचना केली. आयोजकांनी तत्काळ त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. कार्यक्रमात कु. प्राची अनोकार हिने व्यक्त केलेल्या भावनिक मनोगतातून आजोबा स्व. नागोराव अनोकार यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. तिच्या भावना ऐकून सभागृहातील अनेकांचे डोळे पाणावले. तसेच पत्रकार ईश्वरसिंह ठाकूर आणि साहित्यिक विनोद डीडवाणिया यांचाही सामाजिक, साहित्यिक व पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
मनोगतात प्रशांत देशमुख यांनी खामगाव पत्रकार भवन उभारणीत स्व. नागोराव अनोकार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत त्यांच्या दूरदृष्टी, संघटन कौशल्य आणि पत्रकार हितासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, राजेश राजोरे, किशोर भोसले, प्रमिलाताई वानखडे आणि पुरस्कारप्राप्त राजेंद्र काळे यांनीही स्व. अनोकार यांच्या पत्रकारितेतील योगदानाला अभिवादन केले. अशा पुरस्कारांमुळे मूल्याधिष्ठित पत्रकारितेला नवी प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्व. नागोराव गोपाळराव अनोकार यांचे जिवलग मित्र व ज्येष्ठ पत्रकार राजीव तोटे यांचे विशेष सहकार्य लाभले.
माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल
बुलढाण्यात हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे रविवारी जाहीर व्याख्यान
