मेघराज बर्दे यांच्या बर्दिया ब्रिक्स वर्क अँड पेव्हर ब्लॉक उद्योगाचे उद्घाटन; युवकांना उद्योजकतेचा संदेश
आजच्या युवा पिढीने नोकरीच्या प्रतीक्षेत न राहता रोजगारनिर्मितीकडे वाटचाल करावी आणि स्वतःसह इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता विकसित करावी, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केले. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांचे सुपुत्र मेघराज बर्दे यांच्या बर्दिया ब्रिक्स वर्क अँड पेव्हर ब्लॉक या नव्या उद्योगाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे म्हणाले की, चंद्रकांत बर्दे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. संघर्षाचे संधीत रूपांतर करण्याची त्यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सुपुत्राने नव्या उद्योगाची सुरुवात करणे हा आनंददायी योगायोग असून प्रत्येक वडिलांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे, असे त्यांनी नमूद केले.
मेघराज बर्दे यांनी उद्योग क्षेत्रात टाकलेले हे पहिले पाऊल निश्चितच यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत शिंदे म्हणाले की, उद्योग म्हणजे केवळ व्यवसाय नव्हे, तर स्वप्नांना साकार करण्याचा आणि समाजाच्या विकासात मोलाचे योगदान देण्याचा संकल्प आहे. हा उद्योग दिवसेंदिवस प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचावा, भरभराटीला यावा आणि परिसरातील अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा समन्वयक एन. एस. पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित राजपूत, शासकीय योजना प्रचार समितीचे जिल्हा संयोजक अंबादास घेवंदे, भाजपाचे शहराध्यक्ष मंदार बाहेकर, जिल्हा सचिव अशोक किन्होळकर, अल्पसंख्याक जिल्हा संयोजक सलीम चुनावाले, जिल्हा उपाध्यक्ष गजानन घोंगडे, सरपंच डॉ. अनिसभाई, माजी सरपंच ज्ञानेश्वर खंडागळे, परतवाडा येथील उद्योजक टिकाराम प्रजापत, बिटकॉन जिल्हा संयोजक कैलास खराटे, भाजपाचे नेते मोहन पवार, सुनील देशमुख, मुन्ना बेंडवाल, नारायण हेलगे, मोताळा तालुका अध्यक्ष सचिन शेळके, बुलडाणा अर्बनचे व्यवस्थापक सुधीर भालेराव, सागर पवार, रविंद्र गणेशे, पत्रकार संजय काळे, पत्रकार प्रवीण थोरात, हाजी अकीलभाई, सुधाकर गायगोल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपाचे जिल्हा सचिव कृष्णा सपकाळ यांनी केले.

मेघराज बर्दे यांच्या बर्दिया ब्रिक्स वर्क अँड पेव्हर ब्लॉक उद्योगाचे उद्घाटन करताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे व उपस्थित मान्यवर.
मा.आ.एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अनुभव व छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन
हेच नेते आणि प्रतिनिधी आंदोलनाची वेळ येण्यापूर्वी कुठे होते?
