देऊळगाव राजा येथील पीडित ठेवीदारांना संपर्काचे आवाहन
देऊळगाव राजा – सरोज महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, र. नं. ६८०, Deulgaon Mahi देऊळगावमही ता. देऊळगाव राजा, जि.बुलढाणा येथील गैरव्यवहार व अपहारीत रक्कम प्रकरणी ५४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांच्याकडून सुरू आहे. अरुणा मनोज व्यवहारे, विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, सहकारी संस्था (साखर), बुलढाणा यांनी सन २०२३ ते २०२५ या आर्थिक वर्षांच्या लेखापरीक्षणा दरम्यान संस्थेतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणला.
त्यानुसार संस्थेतील गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या आजी-माजी अध्यक्षा, संचालिका, व्यवस्थापक, कर्मचारी वर्ग तसेच काही कर्जदारांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात २१ मे २०२६ रोजी तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा रजिस्टर क्रमांक २३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलमानुसार व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १४६ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम १९९९ चे कलम ३ अंतर्गत एकूण ५४ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या आदेशान्वये या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून तपासाची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, संबंधित पतसंस्थेतील सर्व पीडित ठेवीदारांना आवाहन करण्यात आले आहे की, सदर प्रकरणात साक्षीदार म्हणून जबाब नोंदविणे आवश्यक असल्याने त्यांनी आवश्यक पुरावे व कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी पोलीस निरीक्षक आशिष रोही (मो. ९६०७३०८२२४) तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. राऊत (मो. ९५०३५२७८५५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.
