दोन्ही गटातील ३६ इसमांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- बातमीविश्व टिम
दोन उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. - बुलडाणा जिल्ह्यात होळीचा सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र खामगाव तालुयातील जातीय संघर्षाची दुर्देवी घटना झाल्याने होळी सणाला गालबोट लागले. आज शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटाच्या ३६ इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे.
बुलडाणा जिल्ह्यात होळीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. होलिका दहन शांततेत पार पडले. मात्र रंगपंचमीचा दिवशी घडलेल्या घटेनेने उत्सवाला गालबोट लागले. खामगाव तालुयातील आवार येथे दोन गटात रंग पंचमीच्या दिवशी संध्याकाळी दोन गटात जातीय संघर्ष उडाला. होळी निमित्त गावातील एका गटाच्या युवकांनी मिरवणूक काढली. यावेळी डीजे वर वाजविण्यात येणार्या एका विशिष्ट गाण्यामुळे दुसरा गट दुखावल्या गेला. यामुळे दोन गट समोरासमोर आले. त्यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. यामुळे दोन्ही गटातील सात ते आठ जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधीक्षक पानसरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वरिष्ठ अधिकारी आवार मध्ये दाखल झाले.
बुलडाणा जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. दरम्यान शनिवारी, १५ मार्चला देखील गावात तणाव पूर्ण शांतता आहे. गावातील कडक पोलीस बंदोबस्त अजूनही कायम आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रोनिक लोढा याच्यासह दोन उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खामगाव ग्रामीण पोलिसांनी कॉम्बिग सुरु केले असून धरपकडं करण्यात येत आहे.
