प्रतापराव जाधवांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी; खामगाव तालुक्यात पीक परिस्थितीची पाहणी
बुलढाणा (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील पावसाने दडी मारलेल्या भागांमध्ये अनुकूल हवामान परिस्थिती उपलब्ध असल्यास कृत्रिम पर्जन्यनिर्मिती (Cloud Seeding) प्रयोग तातडीने राबविण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी ५ सप्टेंबर रोजी ई-मेलद्वारे मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन पाठविले.
बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी सध्याच्या कालावधीतील पाऊस अत्यंत महत्त्वाचा असून, पावसाचा खंड कायम राहिल्यास पिकांबरोबरच जलसाठे आणि भूजल पुनर्भरणावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. वेळेत पाऊस न झाल्यास हातातोंडाशी आलेला पिकांचा घास शेतकऱ्यांच्या हातातून निसटण्याची भीती असल्याचे जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अलीकडील साप्ताहिक पर्जन्यमान अहवालाचा हवाला देत जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. २ सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यापेक्षा सुमारे ८७ टक्के कमी नोंदविण्यात आले आहे. तसेच, २ ते ३ सप्टेंबरदरम्यानच्या २४ तासांत बुलढाणा येथे पावसाची नोंद झाली नसल्याचेही हवामान विभागाच्या दैनंदिन नोंदीतून स्पष्ट होते.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पारंपरिक उपाययोजनांसोबतच आधुनिक वैज्ञानिक आणि तांत्रिक पर्यायांचाही तातडीने विचार करण्याची गरज असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. कृत्रिम पर्जन्यनिर्मिती हा त्यापैकी एक संभाव्य पर्याय आहे. या प्रक्रियेमुळे पाऊस पडण्याची निश्चित हमी नसली तरी विशिष्ट प्रकारचे ढग, पुरेशी आर्द्रता आणि अनुकूल वातावरणीय परिस्थिती असल्यास त्याचा प्रयोग करता येतो.
त्यामुळे भारतीय हवामान विभाग (IMD), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) तसेच संबंधित तज्ज्ञ संस्थांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम पर्जन्यनिर्मितीची तांत्रिक व्यवहार्यता तपासून निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील विविध भागांचा दौरा करून पिकांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी राज्यातील पावसाने दडी मारलेल्या विदर्भासह अन्य आवश्यक भागांमध्ये अनुकूल ढग व वातावरणीय परिस्थिती उपलब्ध असल्यास प्रायोगिक तत्त्वावर Cloud Seeding करण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
