लोककलेचा वारसा जपणारा अस्सल हूरहुन्नरी रांगडा कलावंत : दिवंगत शाहीर किसनराव गवई
महाराष्ट्र भूमी विविध लोककला जन्माला घालणारी आहे ज्यायोगे अनेक लोककलाकार व त्यांची प्रतिभा, संपन्न लोकधारा, लोकसंस्कृती उदयास आली. त्या हुरहून्नरी व प्रतिभाशाली लोककलावंताच्या समर्पण व योगदानातून अनेक लोककला उदयास आल्या, त्या जोपसण्याचे काम, त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पारंपरिक, पिढीजात अनेक कुटुंब व घराण्यानी केलेले आहे व करीत आहेत.
महाराष्ट्रात विविध लोककला, लोकधारा, लोकसंस्कृती ज्यामध्ये भारूड, गोंधळ, शाहिरी, पोतराज, वासुदेव, नंदिबैलवाले, रायरंद, बहुरूपी, म्हसानजोगी,पांगुळ, डोंबारी,तमाशा ज्यामध्ये गण, गवळण, लावणी, बतावणी,लावणी वगनाट्य, दशावतार, दंडयार,खडी गंमत यासारख्या बहुवीध लोककला अस्तित्वात आहे ज्यामुळे तत्कालीन परिस्थिती मध्ये समाजाला जनजागृती करून प्रबोधित केल्या जायाचे. आजमितीला ७८ पेक्षा जास्त लोककला, शासनदरबारी दखल घेऊन त्यासाठी संशोधन व शोधकार्य सुरु आहे.
पूर्वीच्या काळी प्रचार प्रसार माध्यम ह्याच लोककला असायच्या. विविध शुभ प्रसंगी, धार्मिक सण, उत्सव, यात्रा, जत्रा, ज्यासाठी जनसमुदाय एकत्र यायचा त्या समुदायास प्रबोधित करण्याचे काम ह्याच लोककला, त्या सादर करणारे संच, पार्टी, संघ करायचे.. विदर्भात अनेक भागात खडी गंमत हा लोककला प्रकार त्या काळी खूपच प्रचलित व लोकप्रिय होता. अनेक नावाजलेल्या ह्या खडी गंमत म्हणजेच आजचे कलापथक सादर करणार्या पार्ट्या होत्या. सन १९६० ते १९९० पर्यंत सदर संचाचे अनेक कार्यक्रम संपूर्ण विदर्भात गाव खेड्यात, ग्रामीण भागात होत असत. बुलडाणा जिल्हा मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी हे गाव सुद्धा विविध लोककला व त्याचा वारसा जपणारे गाव.. त्या गावातील शाहीर किसन गवई आणि पार्टी, दे. माळी या नावाने तत्कालीन काळात प्रसिद्ध पार्टी होती. शाहीर किसन गवई यांनी अविवाहित असताना वयाच्या १५ वर्षापासून कलेचा व्यासंग, आवड जपत, वडील तमाशा कलाकार बळवंता गवई यांचा तत्कालीन तमाशा कलेचा वारसा व बाळकडू घेऊन गावोगावी जाऊन समाज प्रबोधन करण्याचे कार्य सुरु केले. खान्देशी तमाशात असणारी खान्देशी ढोलकी, तुणतुणं, कडी, झाँज,डफ इतकेच काय ते वाद्य साहित्य. पण टिपेला जाणारा सुर जो तुणतुन्याला आवळून निश्चित केलेला असायचा. त्याच सुरात रात्रभर गीत गायन करून व विनोदी संवादाच्या माध्यमातून खडी गमंत अर्थात कलापथक सादर केली जायाची.या खडी गंमत लोक कला प्रकारात स्त्री भूमिका करणारा गडी पुरुष असायचा. तो हौसी, कला उपासक आपल्या स्त्री भूमिकेसाठी साडी – लुगडी परिधान करून, साज शृंगार करून, आपल्या अदाकारीने कार्यक्रमात रंगत भरायचा. तो प्रसंगानुसार कौटुंबिक नवरा बायको,कधी सासू सासरा,या दीर भावजय, राजाची राणी, ह्या विविध भूमिका सकारून नाट्यातून सिद्ध करायचा. या खडी गंमत लोक कलेतून करमणूक व मनोरंजन समाजप्रबोधन केल्या जायाचे. अतिशय कमी मानधन, बिदागी, धान्य ह्या स्वरूपात मोबदला असायचा. दळवळणाचे साधन नाहीत, रस्ते व्यवस्थित नाहीत अगदी पाऊलवाटेने पायी पायीच डोक्यावर आपले वाद्य साहित्य घेऊन हा कलाजत्था गावोगाव पोहचून नियोजित स्थळी रात्रभर संपूर्ण गाव मशालीच्या टेम्भयावरील प्रकाशात खिळवून ठेवायचा.
शाहीर किसन गवई यांचा टिपेला असणारा पहाडी आवाज त्याच आवाजात वदंन गीत, गण सादर केला जायाचा, ज्यामध्ये गवळणी, लावणी, बतावणी असायची.. शाहीर किसन गवई संपूर्ण कार्यक्रमात मुख्य शाहीर, सूत्रधार, सोंगाड्या, मावशी बाई तर कधी गावाचा पाटील, सरपंच, राजा, प्रधान, अशा विविध भूमिका हुबेहूब पार पाडायचे. त्यांच्या हजरजबाबी संवादमुळे, विनोदामुळे लोक खळखळून, पोटभर हसायचे. प्रचंड टाळ्या पडायच्या तर अनेक जण पैशाच्या स्वरूपात बक्षीस द्यायचे. एखाद्या गावात कार्यक्रम बहारदार झाला व गाजला कि लगेच दुसर्या गावात निरोप जायाचे, लोक चर्चा करायचे, त्यामुळे वेगवेगळ्या गावात विविध धार्मिक सण, उत्सव, यात्रा, जत्रा, मुलाचे बारशे, पाचवी किंवा लग्न समारंभात लोक शाहीर किसन गवई च्या संचाला आवर्जून बोलवायचे.
त्यामुळे विदर्भातील अनेक गावात शाहीर किसन गवई च्या ह्या खडी गंमत मसादर करणार्या पार्टीला लोक आवर्जून बोलवायचे. सन १९७५ ते १९८० च्या दरम्यान ह्या खडी गंमत अर्थात कलापथक लोककला प्रकारा द्वारे आंबेडकरी जलसा व विचार धारेतील विविध प्रबोधन व परिवर्तन सांगणारे गीत गायन व संवाद करून लोकांमधील अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, बुवाबाजी, कर्मकांड, जातीभेद निर्मूलन, समता स्थापना, एक गाव एक पाणवठा, शिक्षणाचे महत्व, भारतीय संविधान या सारख्या विषयावर प्रबोधन केल्या जाऊ लागले. शाहीर किसन गवई यांच्या ह्या कलेच्या क्षेत्रातील कार्याची दखल अनेक संस्था संघटना ह्यांनी घेऊन त्यांचा अनेक कार्यक्रमात सत्कार सन्मान केला गेला, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने दखल घेऊन त्यांना शाहिरी, लोककला क्षेत्रातील शासकीय मानधन मंजूर केले.
लोकशाहीर किसन गवई नागपंचमी ला सादर केले जाणारे बारीभजने सुद्धा गाणारे सुप्रसिद्ध असे गायक कलाकार होते. उभी हयातभर अतिशय स्पष्ट, कडवे, कणखर व रोखठोक रागीट बाणेदार स्वभावाचे शाहीर किसन गवई पहाडी आवाजाने गाजत राहिले. असे सांगतात कि त्यांच्या थोरल्या मुलाच्या बारशाला सासुरवाडी मेरा बु. येथे स्वतः लुगडे परिधान करून रात्रभर कार्यक्रमात उपस्थित लोकांचे मनोरंजन केले, बारसे गाजवले.वडील बाळवंता गवई यांचा कलेचा वारसा शाहीर किसन गवई यांनी जपला पण पुढे आपली दोन्ही मुले उच्च शिक्षित होऊन ही कला क्षेत्रापासुन दूर जाऊ दिले नाहीत.कारण कला हे असे निसर्गाचे वरदान आहे कि, तुम्ही कला जिवंत ठेवा- कला तुम्हाला जिवन्त ठेवेल, मेल्यानंतरही. हाच त्यांचा लोककलेचा विचार वारसा तिसर्या पिढीत युवा लोकशाहिर प्रा. गजेंद्र गवई यांनी उभ्या महाराष्ट्रात हजारो कार्यक्रम सादर करून व शेकडो पुरस्कार सन्मान प्राप्त करून जपला आहे. युवा लोकशाहीर प्रा.गजेंद्र गवई यांनी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकॅडमी मध्ये लोककलेचे पदव्यूत्तर पदवीकेचे शिक्षण घेऊन महाराष्ट्रातील अनेक लोककलेचा अभ्यास करत आहेत. शाहीर किसन गवई चा कलेचा हा वारसा त्यांचा दुसरा मुलगा शाहीर विजय गवई सुद्धा जपतो आहे विविध कलापथक शासकीय कार्यक्रम करून. वर्ग २री पर्यंत शिकलेले अल्पशिक्षित शाहीर किसन गवई यांचा जन्म दिनांक २३फेब्रुवारी १९४४ ह्या दिवशी झाला तर १६ मार्च २०२२ रोजी प्रदीर्घ आजाराने त्यांचे शासकीय रुग्णालय बुलडाणा निधन झाले. आयुष्याची ७८ वय वर्षे जगलेला हा कला तपस्वी जाण्याने कला क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली परंतु त्यांचा कलेचा वारसा जपता यावा, त्यांच्या स्मृती कायम रहाव्यात त्यासाठी लोकशिक्षण कला संच,दे. माळी व मातृभूमी कला संच, दे. माळी या शासनदरबारी नोंदणीकृत व कार्यरत पार्ट्या च्या माध्यमातून दरवर्षी नवनवीन युवा कलावंत, ग्रामीण भागातील शोषित पीडित, वंचित, उपेक्षित कलाकार यांना शोधून, त्यांना विविध शासकीय कार्यक्रमात सहभागी करून घेऊन संधी प्राप्त करून देणे, त्यांच्या कला गुणाला वाव देणे, त्यांना रोजगार प्राप्त करून देणे, प्रशिक्षण देणे, संघठीत करने ह्या कार्य व उपक्रमातून खरी दरवर्षी स्मृतीत ठेऊन आठवण करने हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली वाहली जात आहे.
आज १६ मार्च शाहीर किसन गवई यांच्या तिसर्या स्मृतिदिनी त्यांच्या कलेच्या क्षेत्रातील कार्यास व त्यांच्या आठवणीस विनम्र अभिवादन.
रसिक जनाची करण्या सेवा ! फिरतो आम्ही गावोगावा!! रंग चढू दे आज मैफलीला, रंगदेवता तुझाच धावा!!!
