उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील रेल्वे स्थानकासमोर बुधवारी रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हरेश गिजवानी असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या दोन तासांत तीन आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. प्राथमिक तपासानुसार, जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, अशी माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अविनाश नायडू, नूर आलम खान आणि विजय पूरणसिंह उर्फ लेफ्टी अशी आहेत.
तीन हल्लेखोरांकडून गोळीबार; धारदार शस्त्रानेही हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरेश गिजवानी हे कुटुंबासह अंबरनाथ येथे राहत होते. बुधवारी रात्री ते काही कामानिमित्त उल्हासनगर रेल्वे स्थानकासमोरील परिसरात उभे असताना तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर दोन ते तीन राऊंड गोळीबार केला. यातील एक गोळी त्यांच्या छातीत लागली. याशिवाय, त्यांच्या पोटासह शरीराच्या इतर भागांवर धारदार शस्त्रानेही हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हरेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा
घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठवला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डीसीपी सचिन गोरे, एसीपी शंकर आवताडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. पीएसआय रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, चंदू गायकवाड, सागर मोरे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाला वेग दिला.
तांत्रिक तपासातून आरोपींना अटक
पोलिसांनी तांत्रिक तपास आणि विविध पुराव्यांची पडताळणी करत घटनेनंतर अवघ्या दोन तासांत तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेमुळे उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येमागील नेमके कारण काय, २०२१ मधील जुन्या वैमनस्याचा या घटनेशी काय संबंध आहे आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, या दिशेने विठ्ठलवाडी पोलीस तपास करत आहेत. प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे डीसीपी सचिन गोरे यांनी सांगितले.
