अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध; नाव नोंदणी आणि दुरुस्तीसाठी नागरिकांना संधी
मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे आणि हरकती सादर करण्याच्या मुदतीत भारत निवडणूक आयोगाने पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती सादर करण्यासाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच नोटीस टप्पा आणि दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.
नाव नोंदणी, दुरुस्तीसाठी महत्त्वाची संधी
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंदींमधील चुका दुरुस्त करणे तसेच आवश्यकतेनुसार हरकती नोंदविण्यासाठी ही मुदतवाढ महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादी तपासून आपले नाव आणि वैयक्तिक तपशील पडताळावेत. नाव वगळले गेले असल्यास किंवा नोंदींमध्ये त्रुटी आढळल्यास विहित प्रक्रियेनुसार २६ ऑक्टोबरपूर्वी अर्ज सादर करावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
