नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर विभागांत प्रक्रिया; ५ सप्टेंबरपर्यंत पडताळणी पूर्ण होणार
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित) पदांच्या भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. पवित्र पोर्टलमार्फत शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून, नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथील अपर आयुक्त कार्यालयांकडून यासंदर्भातील सविस्तर सूचना व वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गाची एकूण २ हजार ४२१ रिक्त पदे भरण्यात येत आहेत. यासाठी शिक्षण आयुक्तालयाकडून मुलाखतीविना निवडीसाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक संवर्गातील १ हजार ६०० उमेदवारांची यादी आदिवासी विकास विभागाला प्राप्त झाली आहे.
यामध्ये ९२७ प्राथमिक शिक्षक, ४२१ माध्यमिक शिक्षक आणि २५२ उच्च माध्यमिक शिक्षक उमेदवारांचा समावेश आहे. त्यापैकी ४५९ उमेदवार पेसा क्षेत्रातील, तर १ हजार १४१ उमेदवार नॉन–पेसा क्षेत्रातील आहेत.
नाशिक विभागातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक
विभागनिहाय विचार करता नाशिक विभागातील ५८८ उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी निश्चित करण्यात आली आहेत. त्यानंतर ठाणे विभागातील ४२४, नागपूर विभागातील २९६ आणि अमरावती विभागातील २९२ उमेदवारांचा समावेश आहे.
कागदपत्र पडताळणीदरम्यान उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदविलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ सर्व आवश्यक मूळ प्रमाणपत्रे, जाहिरातीनुसार आवश्यक कागदपत्रे तसेच प्रत्येक कागदपत्राची स्वयंप्रमाणित छायांकित प्रत सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.
उमेदवारांनी त्यांना निश्चित करून देण्यात आलेल्या दिनांक, वेळ आणि ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. निर्धारित वेळेत अनुपस्थित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
पेसा क्षेत्रातील पदांचा तपशील
पेसा क्षेत्रातील शिक्षक पदांमध्ये प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमाची १९६, प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाची १६, माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाची ९४, माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाची २ आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची १५१ पदे आहेत.
तर नॉन-पेसा क्षेत्रात प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमाची ५९३, प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाची १२२, माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाची ३०२, माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाची २३ आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची १०१ पदे भरण्यात येणार आहेत.
उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर माहिती पाहण्याचे आवाहन
आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले की, शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली असून, त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
संबंधित उमेदवारांनी निर्धारित दिनांक, वेळ आणि ठिकाणी उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पात्र उमेदवारांची सविस्तर यादी तसेच भरती प्रक्रियेबाबतच्या अद्ययावत सूचना आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देऊन पुढील सूचना आणि वेळापत्रकाची माहिती घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
