स्व. सखाराम जाधव स्मृतिदिनानिमित्त श्री शिवाजी विद्यालय, हातेडी येथे प्रेरणादायी कार्यक्रम; शिक्षणातून मोठी स्वप्ने साकार करण्याचे आवाहन
बुलडाणा : “विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाची जोड द्यावी. परिश्रमाची तयारी असेल तर यश नक्की मिळते,” असे प्रेरणादायी प्रतिपादन नगरसेवक प्रा. सुनील सपकाळ यांनी केले. श्री शिवाजी विद्यालय, हतेडी येथे स्वर्गीय सखाराम जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य ॲड. बाबासाहेब भोंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ अर्बनचे शिवाजीराव तायडे, गजानन राऊत, अशोकराव पाटील, सत्यजित राऊत, सुभाष जाधव, गोपाळराव जाधव, सरपंच श्रीकांत जाधव, बबननाना जाधव, प्रशांत गाडे तसेच मुख्याध्यापिका सौ. अनुपमा जाधव उपस्थित होत्या.
यावेळी अध्यक्षीय भाषणात ॲड. बाबासाहेब भोंडे यांनी आजचे राजकारणी समाजापासून दुरावत चालल्याची खंत व्यक्त केली. गुणवत्तापूर्ण शिक्षण गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी दिवसेंदिवस दुरापास्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. सपकाळ पुढे म्हणाले की, स्व. सखाराम जाधव यांनी गावात शिक्षणाची गंगा आणण्याचे मोठे कार्य केले. त्यांच्या कार्याचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावा. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख आणि पंढरीनाथ पाटील यांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले. ग्रामीण भागातील मराठी शाळेत शिकलेला विद्यार्थीही जगभरात यश मिळवू शकतो, हा आत्मविश्वास महापुरुषांच्या कार्यातून निर्माण झाला आहे.
“शिक्षक विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देतात; मात्र आकाशात झेप घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी स्वतः विकसित केली पाहिजे. ससा आणि कासवाच्या गोष्टीतील कासवाप्रमाणे जिद्द कायम ठेवली, तर यश निश्चित मिळते,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत शिक्षण, ध्येय आणि आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून दिले.स्वर्गीय सखाराम जाधव यांनी विद्यालयासाठी जमीन उपलब्ध करून देत शाळेच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले होते. सलग वीस वर्षे सरपंच म्हणून त्यांनी गावाच्या विकासासाठी काम केले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या वीस वर्षांपासून विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पवित्र पोर्टलद्वारे राज्यात ३०,२०९ शिक्षक पदांची भरती; प्राधान्यक्रम नोंदणीला सुरुवात
अभिनेते मिथुन चक्रवर्तींवर शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर, चाहत्यांना दिलासा
हातणी-वळती माईस प्रकल्प व सिंदखेडराजा ‘जिजाऊ सृष्टी’ला गती; विदर्भ पर्यटनाला नवी दिशा
