आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी; घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बुलढाणा, प्रतिनिधी : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने सोमवारी (२७ जुलै) बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या आवाहनानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून बुलढाण्यातही पक्षाने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाजभूषण भाई दिलीप खरात, जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव, समाजसेवक इंजि. भैयासाहेब पाटील, विदर्भ कार्याध्यक्ष मुरलीधर गवई, जिल्हा महिला अध्यक्षा वंदना वाघ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात शासनाने नियुक्त केलेली बडर समिती रद्द करावी, तिचा अहवाल सार्वजनिक करावा तसेच जातीय जनगणना पूर्ण झाल्याशिवाय अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करू नये, अशी मागणी करण्यात आली. अपुऱ्या माहितीच्या आधारे उपवर्गीकरण केल्यास अनुसूचित जातीतील अनेक घटकांवर अन्याय होईल, तसेच विविध समाजघटकांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. राज्यभरातील दलित व आंबेडकरी समाज या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन करत असून शासनाने तातडीने निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या आंदोलनात प्रा. दिलीप काकडे, मुक्तार पठाण, प्रकाश पाटील, नवाब मिर्झा बेग, केशवराव सरकटे, हिम्मतराव जाधव, अतिश मोरे, बाळासाहेब आहिरे, सुषमा झिने, उषा इंगळे, राजेश हिवाळे, अजय झिने, आनंद गवई, राजू रंधवे, प्रमोद रंधवे, राहुल आवसरमोल, शंकर म्हस्के, किरण गवई, फकीरा निकाळजे, साहिल आहिरे, दत्ता राहणे, उपसरपंच महेबूब खान, शिवाजी खरात, सुखदेव कांबळे, देवानंद तुपमाने यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.
सिंहस्थपूर्वी कपिलधाराच्या विकासाला गती; १७ ऑगस्ट २०२७ रोजी पारंपरिक स्नान
