चिखली जि.बुलढाणा – जवाहर नवोदय विद्यालय काटा (ता. औसा जि.लातूर) या वस्तीगृहामध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकणार्या निरागस अनुष्का पाटोळे या बारा वर्षीय मुलीचा दिनांक ३ जानेवारीच्या रात्री झालेला संशयस्पद मृत्यू संपूर्ण समाज मनाला हादरवून सोडणारा आहे. ही हत्या की आत्महत्या, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येऊन दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच अनुष्काला न्याय मिळावा, या मागणीसाठी चिखली तालुक्यातील सकल मातंग समाज एकवटला आहे.
या पार्श्वभूमीवर सकल मातंग समाजाच्या वतीने आज दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान चिखली शहरात शांत, शिस्तबद्ध व विना आवाज कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. कॅन्डल मार्चची सुरुवात सायंकाळी ५:३० वाजता चिखली शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण आणि अनुष्काला भावपुर्ण श्रद्धांजली व हातात कॅण्डल मार्च मार्ग होणार असून, त्यानंतर सम्राट अशोक, फुले व डॉ.आंबेडकर वाटिकेतील महापुरुषांना वंदन करण्यात येणार आहे.
हा कॅन्डल मार्च पोलीस लाईन सिंधी कॉलनी चौक अंजली टॉकीज मार्गे पुढे जात फुलेशाहूआंबेडकर वाटिका जयस्तंभ चौक येथे समारोप होणार असून या बालिकेच्या मृत्यूने व्यथित झालेल्या समाजभावनेला शब्द देत, हा कॅन्डल मार्च केवळ संवेदना व्यक्त करण्यासाठी नसून, प्रशासनाचे लक्ष वेधून अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठीचा शांततामय लढा असल्याचे सकल मातंग समाजाच्या वतीने सांगण्यात आले. या कॅन्डल मार्चमध्ये सर्व नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी व न्यायप्रिय नागरिकांनी शांतता, शिस्त व सौहार्द राखत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
