संग्रामपूर- तालुक्यातील सोनाळा बसस्टॅण्डजवळ उभी असलेली मोटारसायकल अचानक पेटल्याची घटना आज २ जानेवारी रोजी दुपारी घडली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मोटारसायकल विजय खंडारे (रा. सोनाळा) यांची असून गाडी बसस्टॅण्डजवळ उभी करून ठेवण्यात आली होती. अचानक गाडीच्या इंजिन भागातून धूर निघू लागल्यानंतर काही वेळातच आगीच्या ज्वाळा उसळल्या. आगीची तीव्रता इतकी होती की काही क्षणात संपूर्ण दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.सदर मोटार सायकल ही विजय खंडारे, रा. सोनाळा यांची एनएस पल्सर २००सीसी असल्याची माहिती समोर आली आहे. सोनाळा बस स्टँड समोर गाडी उभी असतानाच अचानक आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काहींनी पाणी व वाळू टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, दुचाकी पूर्णतः जळाल्याने वाहनमालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किट अथवा तांत्रिक बिघाडाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सोनाळा पोलिसात कोणतेही प्रकारची तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती आहे.या घटनेमुळे बसस्टॅण्ड परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उघड्यावर उभी असलेली वाहने सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करूनच वापरण्याचे आवाहन सोनाळा पो.स्टेचे सपोनि प्र.ठाणेदार संदीप काळे यांनी केले आहे.
